तुम्ही चाखून पाहिलीत का ही फळे?

fruit
फळे हा आपल्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग आहे. फळांच्या सेवनाने आपल्या शरीराला जीवनसत्वे, क्षार, फायबर आणि तत्सम इतर पोषक घटक मिळत असतात. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या फळांमध्ये, तिथे असणारे हवामान, ऋतुमान लक्षात घेता विविधता पाहण्यास मिळते. आजकाल परदेशी मूळ असलेली अनेक फळे भारतामध्ये सहज उपलब्ध असली, तरी यातील काही फळे मात्र आपल्या अजूनही तितकीशी परिचयाची नाहीत. उदाहरणार्थ ‘पॉ-पॉ’ नामक फळ खास उत्तरी अमेरिकेतील स्थानिक फळ असून, याची चव केळ्याच्या आणि आंब्याच्या मिश्रित चवीप्रमाणे लागते. या झाडाला फळे लागण्यापूर्वी जो मोहोर येतो, त्याला भयंकर दुर्गंधी असते. हे फळ सुमारे पंधरा ते सतरा सेंटीमीटर लांबीचे असून, तीन ते सात सेंटीमीटर रुंद असते. एका पॉ-पॉ फळाचे वजन साधारण वीस ग्राम ते अर्धा किलो पर्यंत असते. या फळामध्ये बिया जास्त असून, हे फळ कच्चे असताना कैरीसारखे हिरवे आणि पिकल्यावर पिवळे दिसते. या फळामध्ये प्रथिने मुबलक असतात. या फळांचा वापर आईस्क्रीम किंवा इतर तत्सम मिठाया बनविण्याकरिता केला जातो.
fruit1
सिंगापूर, थायलंड, इत्यादी देशांतील स्थानिक फळ ‘दुरियन’ याचा वास इतका उग्र असतो, की या देशांमध्ये विमानाने प्रवास करायचा असल्यास हे फळ सोबत नेण्यास बंदी केली गेली आहे. सर्व फळांमधील सर्वात उग्र वासाचे फळ अशी याची ख्याती आहे. हे फळ सिंगापूर देशाचे राष्ट्रीय फळ आहे. याचा वास इतका उग्र असतो, की हे फळ त्या ठिकाणाहून हलविल्यानंतरही याचा वास मात्र सहजासहजी जात नाही. या फळामध्ये कर्बोदके मुबलक असून या फळाच्या सेवनाने शरीरामध्ये त्वरित ऊर्जा निर्माण होते. या फळामध्ये पोटॅशियम, लोह, फायबर आणि क जीवनसत्वही मुबलक प्रमाणामध्ये आहे. या फळाच्या सुमारे तीस प्रजाती पहावयास मिळतात.
fruit2
‘मिरॅकल फ्रूट’ नामक फळ पश्चिम आफ्रिकेतील स्थानिक फळ असून, लाल रंगाची ही छोटी फळे असतात. हे फळ खाल्ल्यानंतर सुमारे अर्धा तासापर्यंत आपल्या जिभेला आंबट चवीची संवेदना राहत नसून, हे फळ खाल्ल्यानंतर कुठलेही आंबट फळ खाल्ल्यास ते चवीला गोडच लागते. म्हणूनच या फळाला ‘मिरॅकल फ्रूट’ म्हटले जाते. या फळामध्ये साखरेचा अंश अतिशय कमी असल्याने मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी हे फळ अतिशय चांगले मानले गेले आहे. लालसर-केशरी रंगाच्या, पीनट बटर सारख्या चवीच्या या फळाला ‘पीनट बटर फ्रूट’ याच नावाने ओळखले जाते. हे फळ पेरू, वेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया, आणि सुरीनाम या देशांमध्ये पहावयास मिळते. हे फळ कच्चेही खाता येत असून, पिकलेल्या फळापासून जॅम आणि जेली बनविण्यात येतात. या फळाचा आकार साधारण एखाद्या जांभळाइतका असून, यामध्ये गर जास असतो.
fruit3
‘आईसक्रीम बनाना’ हे फळ दक्षिण पूर्वी आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहावयास मिळते. यालाच ‘ब्ल्यू जावा बनाना’ असे ही म्हटले जाते. अतिशय थंडीच्या मोसमातही पिकणारे हे फळ चवीला व्हॅनीला प्रमाणे लागते. ‘स्नेक फ्रूट’ हे बाहेरून सापाच्या कातडीप्रमाणे दिसणारे फळ इंडोनेशियामधील जावा, सुमात्रा या ठिकाणचे स्थानिक फळ आहे. सापाच्या कातडी प्रमाणे दिसणारी आणि स्पर्शाला काटेरी साल असणारे हे फळ चवीला आंबट-गोड असते. ज्या झाडावर हे फळ उगविते त्या झाडाला स्थानिक भाषेमध्ये ‘सालाक’ म्हटले जाते. सालीच्या आतील गर पांढरा असून, लसणीच्या पाकळ्यांच्या प्रमाणे हा गर दिसतो.

Leave a Comment