काय म्हणावे या व्यक्तींच्या नशीबाला !

unlucky
अनेकदा काही व्यक्तींना आयुष्यात फारसे कष्ट न करता आयुष्यामध्ये सर्व काही मिळते. काहींनी मात्र अपार प्रयत्न करुनही यश, संपत्ती, प्रसिद्धी अशा गोष्टी त्यांच्यापासून लांबच राहतात. अशा वेळी नशीबाला बोल लावून आपण कमनशिबी असल्याचे मान्य करून सद्य परिस्थितीचा स्वीकार करून योग्य संधी मिळण्याची वाट पाहण्याखेरीज एखाद्याच्या हातामध्ये दुसरे काहीच रहात नाही. पण या जगामध्ये काही व्यक्तींच्या बाबतीत असे काही घडले, की त्यांच्या नशीबाला काय म्हणावे हेच कळेनासे होते. या व्यक्तींच्या बाबतीत नेमके काय घडले हे जाणून घेऊ या.
unlucky1
दर वर्षी स्पेनमधील सोडेटो गावामध्ये राहणारे नागरिक ‘एल गोर्डो’ नामक लॉटरी खरेदी करतात. सोडेटो गावातील ‘होम मेकर्स असोसिएशन’चे सभासद घरोघर जाऊन या लॉटरीची तिकिटे नागरिकांना देत असतात. २०११ साली असोसिएशनच्या सभासदांनी दर वर्षीप्रमाणे घरोघरी जाऊन लॉटरीची तिकिटे वाटली. या साली एकूण अडीचशे परिवारांमध्ये तिकिटे वाटली गेली असून, केवळ एकाच नागरिकाच्या घरी काही कारणाने तिकीट दिले गेले नाही. हे घर होते कॉस्तीस मित्सोटाकिस नामक ग्रीक चित्रपट निर्मात्याचे. आश्चर्य असे, की जेव्हा लॉटरीचा निकाल लागला तेव्हा सोडेटो गावातील सर्वांच्याच तिकिटांवर बक्षिसे लागली. पूर्ण गावाला एकत्रितपणे ९५० मिलियन डॉलरची रक्कम मिळाली. प्रत्येकी सुमारे १३०,००० डॉलर्सचे बक्षीस लागलेले सोडेटोमधील सर्व परिवार रातोरात लखपती झाले. कॉस्तीसच्या एकट्याच्या नशिबामध्ये मात्र हे बक्षीस नव्हते.
unlucky2
ज्या काळी ‘अॅपल’ कंपनीची स्थापना झाली त्याकाळी अनेक सह-संस्थापकांपैकी रोनाल्ड वेन हे देखील एक होते. या कंपनीमध्ये रोनाल्ड यांचा दहा टक्के वाटा होता. मात्र ही कंपनी चालूच शकणार नाही अशी खात्री रोनाल्ड यांना वाटत असल्यामुळे रोनाल्ड यांनी आपल्या कंपनीतला दहा टक्के हिस्सा केवळ ८०० डॉलर्सला विकून टाकला. आजच्या काळामध्ये अॅपल आर्थिक दृष्ट्या आघाडीवर असलेल्या कंपन्यांमध्ये एक असून, आजच्या काळामध्ये जर रोनाल्डचा या कंपनीमध्ये दहा टक्के हिस्सा असता, तर त्याची किंमत ९५ मिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक असती. रोनाल्डने मात्र या कंपनीमधला आपला हिस्सा केवळ आठशे डॉलर्समध्ये विकून टाकला होता !

व्हायोलेट जेसोप आणि रॉय सलिवन यांचे माशीब मात्र फारच बलवत्तर ठरले. रॉय सलिवन अमेरिकेतील व्हर्जिनिया भागामध्ये पार्क रेंजर म्हणून तैनात होता. १९४२ साली रॉय ड्युटीवर असताना एका फायर टॉवरमध्ये उपस्थित होता. त्यावेळी आलेल्या वादळामध्ये या फायर टॉवरवर अचानक वीज कोसळली. पण रॉयचे नशीब बलवत्तर म्हणून त्याला कोणतीही इजा झाली नाही. त्यानंतर सुमारे सत्तावीस वर्षांच्यानंतर १९६९ साली रॉय डोंगराळ भागातून आपल्या कार मधून प्रवास करीत असताना त्याच्या कारवर पुनश्च वीज कोसळली. त्यावेळीही सुदैवाने रॉयला कोणतीही इजा झाली नाही. या घटनेनंतर आणखी चार वेळा रॉयवर वीज कोसळल्याच्या घटना घडल्या, पण प्रत्येक वेळी नशीब बलवत्तर म्हणून रॉय सहीसलामत बचावला. तब्बल सहा वेळा वीज कोसळूनही सुखरूप बचाविलेल्या रॉय सलिवनचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे.
unlucky3
रॉय प्रमाणेच व्हायोलेट जेसोप हिच्या नशीबानेही तिला अनेकदा साथ दिली. व्हायोलेट वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘स्ट्यूअर्डेस’ म्हणून ‘रॉयल मेल स्टीम पॅकेट कंपनी’च्या जहाजावर रुजू झाली. १९१० साली व्हायोलेटने ‘व्हाईट स्टारलाईन’मध्ये नोकरी स्वीकारली आणि तिला ऑलिंपिक जहाजावर पाठविण्यात आले. १९११ साल ऑलिम्पिक आणि एचएमएस हॉक नामक जहाजांची आपापसात टक्कर होऊन ऑलिम्पिकला मोठे नुकसान झाले, पण सुदैवाने हे जहाज कसेबसे किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर व्हायोलेटची पाठवणी टायटॅनिकवर झाली असून, या जहाजाला पहिल्याच सफरीमध्ये जलसमाधी मिळाल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. टायटॅनिक समुद्रामध्ये बुडत असताना व्हायोलेटने एका लाईफबोटवर चढून आपला जीव वाचविला होता. ही घटना १९१२ सालची होती. त्यानंतर १९१६ साली व्हायोलेट ‘ब्रिटानिका’ नामक जहाजावर काम करीत होती. २१ नोव्हेंबर १९१६ रोजी समुद्राच्या पाण्याच्या खाली असलेल्या मोठ्या खडकांना धडकल्याने याही जहाजाला जलसमाधी मिळाली. याही वेळी व्हायोलेटने एका लाईफबोटमध्ये चढून आपले प्राण वाचविले. इतक्या अपघातांना तोंड देऊनही व्हायोलेटने त्यानंतर अनेक जहाजांवर स्ट्यूअर्डेस म्हणून काम केले असून, अखेर १९५० साली व्हायोलेट निवृत्त झाली.

Leave a Comment