
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज नागपूर येथून दाखल केला. तेव्हा दिलेल्या शपथपत्रानुसार गडकरी यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत तसेच गेल्या पाच वर्षात गडकरींच्या संपत्तीत १४० टक्के वाढ झाली आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना गेल्या ५ वर्षाचे आयकर विवरण घोषित करण्याचा नियम केला गेला आहे. त्यानुसार गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
गडकरी यांच्यापेक्षा पत्नी श्रीमंत- संपत्तीत ५ वर्षात १४० टक्के वाढ
या नुसार गडकरी यांची २०१७-१८ सालातील वार्षिक कमाई ६ लाख ४० हजार असून पाच वर्षापूर्वी ती २ लाख ७० हजार होती. त्यात सर्वाधिक वाढ २०१४-१५ या काळात झाली आहे. गडकरी यांच्या पत्नीची कमाई २०१४-१५ मध्ये ४ लाख ६० हजार होती ती ४० लाखांवर गेली आहे. गडकरी यांची एकूण संपत्ती ६ कोटी ९० लाख असून त्यात वडिलोपार्जीत घराचा समावेश आहे. गडकरी यांच्याकडे वरळी मध्ये एक सदनिका आणि २२ लाखांचे दागिने आहेत. अर्थात गडकरी यांची बँकेतील शिल्लक आणि गुंतवणूक या काळात ५७ टक्क्याने घटली आहे. त्यांच्याकडे एक अम्बेसिडर व एक होंडा कार आहे. गडकरी यांचे कर्ज १.३ कोटींवरून १.५७ कोटींवर गेल्याचे या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
