जपानमधील या’द व्हॅली ऑफ डॉल्स’ गावात माणसांपेक्षा बाहुले जास्त

doll
जपानी डॉल आर्टिस्ट त्सुकिमी आयानो हिला मित्रमंडळींची कमतरता मुळीच नाही, कारण हिने आपले मित्रमंडळ स्वतः तयार केले आहे. आपल्या ऐन उमेदीचा काळ जपानमधील ओसाका शहरामध्ये घालविल्यानंतर निवृत्तीच्या काळामध्ये मात्र आयानोला आपल्या जन्मगावी परतायची ओढ लागली. त्या प्रमाणे तिने आपला मुक्काम आपल्या जन्मगावी, म्हणजेच शिकोकू बेटावरील नागोरो नामक लहानशा गावी हलविला. मात्र आता, एके काळी तीनशे हूनही अधिक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये आता केवळ पस्तीस जणेच उरली होती. एक तर उदरनिर्वाहासाठी अनेक जण मोठमोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले होते, मागे उरलेल्या निवृत्त, वयस्क मंडळींपैकी अनेक आता ह्यात नव्हते.
doll1
काहीशा निर्जन गावामध्ये आयानो ने परतल्यानंतर ज्या ज्या व्यक्ती आता हयात नाहीत, त्यांचे पुतळे बनविण्यास आयानोने सुरुवात केली. पाहता पाहता पंधरा वर्षांचा काळ लोटला. या काळात पाहता पाहता अनेक ओस पडलेल्या घरांच्या बाहेर आयानोने त्या घरामध्ये एके काळी रहात असणाऱ्या व्यक्तींच्या सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या बनविल्या . आता या गावामध्ये जिवंत माणसे कमी आणि बाहुल्याच अधिक झाल्या असल्याने या गावाने आयानोला प्रसिद्धी मिळवून दिली . या बाहुल्यांच्या गावाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून येत असतात. आयानोने बनविलेल्या या बाहुल्या या गावाचे आकर्षण ठरत असल्याने या गावावर आणि आयानोवर आधारित एक माहितीपटही बनविण्यात आला असून, ‘द व्हॅली ऑफ डॉल्स’ असे या माहितीपटाचे नाव आहे. या माहितीपटामध्ये आयानोने आपल्या बाहुल्यांबद्दल बोलत सांगितले कि या बाहुल्या आपल्याला आपल्या जीवाभावाच्या लोकांप्रमाणे वाटत असतात . गावातील शाळेमध्ये देखील आयानोने बनविलेल्या बाहुल्या आहेत. इतकेच नव्हे तर आयानोने स्वतःसारखी दिसणारी देखील एक बाहुली बनविली आहे.
doll2
जपानमध्ये आजच्या काळामध्ये अशी सुनसान गावे खूप ठिकाणी पहावयास मिळत आहेत. रोजगार आणि शिक्षणाच्या निमित्ताने तरुण वर्ग मोठ्या शहरांकडे आकृष्ट होत असतानाच, अधिकाधिक जपानी दाम्पत्ये मुले जन्माला न घालण्याचा निर्णय घेत असल्याने लोकसंख्या वाढण्याला आळा बसला आहे. म्हणूनच सर्वात जास्त लोकसंख्या शहरी भागांमध्ये दिसून येत असून, अनेक ग्रामीण भागांमध्ये मात्र बोटांवर मोजता येतील इतपतच लोक राहत असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये म्हटले गेले आहे.

Leave a Comment