भाजपला जाणवणार या ताऱ्याची अनुपस्थिती

BJP1
निवडणुकीच्या रणांगणात अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली आणि यशही मिळविले. काळानुसार त्यातील अनेक जण आता राजकारणातून नाहीसे झाले असले तरी काही तारकांची अनुपस्थिती हळहळ करायला भाग पाडते. प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना हे अशाच ताऱ्यांपैकी एक नाव. दोन वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या खन्ना यांची अनुपस्थिती यंदाच भारतीय जनता पक्षाला चांगलीच जाणवणार आहे.

चित्रपटाच्या क्षेत्रात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा प्रतिस्पर्धी म्हणून खन्ना यांच्याकडे पाहिले गेले. योगायोगाने हे दोन तारे राजकारणातही आले. मात्र ऐन भरात असताना खन्ना यांनी संन्यास घेतला आणि काही वर्षे ते सामाजिक जीवनातून फेकले गेले. त्यानंतर परत आल्यावर त्यांनी राजकारणात नवी इनिंग सुरू केली. येथे मात्र त्यांनी बच्चन यांच्यावर मात केली. बोफोर्स प्रकरणात आरोप झाल्यानंतर अमिताभ यांनी राजकारणाला टाटा केला. विनोद खन्ना यांनी मात्र राजकारणात राहून दीर्घकाळ आपल्या मतदारसंघातील जनतेचा कौल मिळविला.

पंजाबमधील गुरदासपूर हा खन्ना यांचा मतदारसंघ. एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या गेलेल्या या मतदारसंघाला खन्ना यांनी सुरुंग लावला आणि तेथे भाजपचे निशाण रोवले. गुरदासपूरच्या जनतेवर विनोद खन्नांनी अशी जादू केली, की तेथे त्यांनी चार वेळेस भाजपला यश मिळवून दिले.

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला गुरदासपूरचा मतदारसंघ कायम काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथे 1957 पासून 1996 पर्यंत फक्त आणि फक्त काँग्रेसला यश मिळाले होते. अपवाद 1977 चा. त्यावेळी आणीबाणीमुळे निर्माण झालेल्या काँग्रेसविरोधी लाटेत जनता पक्षाचे यज्ञदत्त शर्मा हे येथून लोकसभेत निवडून आले होते. मात्र 1998 मध्ये विनोद खन्ना यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर येथून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आणि पाच वेळेस खासदार असलेल्या सुखबंस कौर भिंडर यांना पराभूत करून त्यांनी काँग्रेसकडून ही जागा हिसकावून घेतली. त्यावेळी काँग्रेसचे सुनील दत्त यांचा अपवाद वगळता राजकारणात चित्रपट तारे-तारकांना फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जात नव्हते.

मात्र विनोद खन्ना यांनी प्रामाणिकपणे काम करून जनतेची मने जिंकली आणि 1999 व 2004 मध्ये विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक केली. परंतु 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना स्थानिक नेते आणि काँग्रेसचे माजी मंत्री प्रतापसिंह बाजवा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2014 मध्ये विनोद खन्ना यांनी बाजवा यांना पराभूत करून लोकसभेत पुनरागमन केले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या खन्ना यांचे 2017 मध्ये निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने आपली ही पारंपरिक जागा पुन्हा हस्तगत केली.

दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव इत्यादींचा अपवाद करता बहुतेक सेलिब्रिटी चित्रपटसृष्टीत नाव, पैसा व प्रसिद्धी मिळविल्यानंतर दुसरा पर्याय म्हणून राजकारणात येतात. मात्र विनोद खन्ना यांनी राजकारणात जाऊन समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात 1999 ते 2004 या काळात ते केंद्रात मंत्री होते. ते सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री असतानाच चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा मिळाला. परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावरही त्यांनी काम केले. राजकारणात राहूनही कुठल्याही वादविवादात अडकले नाहीत.

यंदाच्या निवडणुकीतही ही जागा भाजप कडून जिंकण्यासाठी काँग्रेस निकराचा प्रयत्न करेल. लोकसभेचे दिवंगत माजी सभापती बलराम जाखड यांचे पुत्र चिरंजीव सुनील जाखड यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र भाजप सध्या येथे उमेदवारासाठी चाचपडत आहे. खन्ना यांची पत्नी कविता खन्ना तसेच चिंरजीव आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्यासहित अनेक नावांची चर्चा होत आहे. यातून भाजपला जाणवणारी उमेदवारांची चणचणच समोर येत आहे.

आपले समकालीन हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह विनोद खन्ना यांनी भाजपमध्ये चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व केले. सत्तेत नसतानाही पक्षात टिकून राहून गांभीर्याने काम केले. आज सिन्हा यांनी पक्षात 28 वर्षे काम केल्यानंतर ते बंखोर बनले आहेत. त्यांचे तिकिट कापण्याची वेळ पक्षावर आली आहे. कीर्ती आझाद नवज्योतसिंग सिद्धू हे भाजपातून बाहेर पडले आहेत. अशा वेळेस भाजपला आपल्या या निष्ठावान आणि उमद्या नेत्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Comment