वायनाडमध्ये राहुल गांधी – काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण

rahul-gandhi
घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणतात तशी गत सध्या काँग्रेसची झाली आहे. एकीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राहुल गांधी निकराचा प्रयत्न करताना दिसतात, तर त्यांचे सल्लागार मात्र त्यांना दुसऱ्या दिशेने ओढण्यात गुंतले आहेत. तसे नसते तर त्यांनी अमेठीशिवाय आणखी एका मतदारसंघात लढण्याचा सल्ला त्यांना कोणी दिला नसता. वायनाडमध्ये राहुल गांधी यांची यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

केरळ प्रदेश काँग्रेस समितीने राहुल गांधी यांना राज्यातील एका जागेवरून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. त्यांना वायनाडची सुरक्षित जागा सुचविण्यात आली होती.ती त्यांनी मान्य केली, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस ओम्मन चांडी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या घडामोडीला दुजोरा दिला. ‘काँग्रेसच्या केरळ शाखेने मागणी केली होती आणि आम्ही त्याचे कौतुक करतो. पक्षाध्यक्ष अन्य सर्व मुद्द्यांसोबतच यावरही विचार करतील,’ असे ते म्हणाले. याचाच अर्थ राहुल निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले नाही. म्हणजे ते अमेठी आणि वायनाड अशा दोन जागांवरून निवडणुकीत उतरतील.

राज्यघटनेनुसार एखादा नेता एकापेक्षा अधिक जागेवरून निवडणूक लढवू शकतो. गेल्या वेळेस पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनीही वाराणसी आणि बडोद्यातून निवडणूक लढवली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी वाराणसीची जागा आपल्याकडे ठेवली आणि बडोद्याचा राजीनामा दिला. मात्र मोदी हे तेव्हा केवळ एक मुख्यमंत्री होते. गुजरातबाहेर त्यांचे काम कोणी पाहिलेही नव्हते. शिवाय उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य असल्याने आपण त्या राज्यातून निवडणूक लढवत असल्याचे दाखवणे त्यांना भाग होते.

राहुल गांधी यांची गोष्ट वेगळी आहे. एक तर इंदिरा गांधी यांच्यानंतर गांधी घराण्यातील कोणीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली नव्हती. दुसरे म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात राहुल यांना विजयासाठी झुंजवले होते. गेली पाच वर्षे त्यांनी अमेठीवर लक्ष केंद्रीत केले आहे आणि यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांना हरविण्याचा विडा उचलला आहे. अशा परिस्थितीत राहुल यांनी आपला मतदारसंघ बदलून थेट केरळमध्ये जाणे म्हणजे त्यांनी आत्मविश्वास गमावल्याचे लक्षण मानण्यात येईल. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनीही अशाच प्रकारची टीका केली आहे. “काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर भाजपाशी सामना करत आहे. केरळमध्ये त्यांचा सामना माकपशी आहे. म्हणजेच भाजपकडून पराभूत झालो तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पराभूत करू, असा त्यांचा इरादा दिसतो. यातून काय संदेश जातो,” असे विजयन म्हणाले. वायनाडमधून आपला उमेदवार मागे घेणार नाहीत, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कणम राजेंद्रन यांनी स्पष्ट केले आहे. “आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही कडवी झुंज देऊ. काँग्रेसचा आत्मविश्वास हरवला आहे. म्हणूनच राहुल गांधी वायनाडमध्ये निवडणूक लढवत आहेत,” असे कोडियरी म्हणाले.

अमेठी मतदारसंघ पूर्वासारखा सुरक्षित वाटत नाही हे राहुल यांना माहीत आहे. म्हणूनच ते वायनाडमध्ये निवडणूक लढवत आहेत. राज्य काँग्रेसमधील दोन गट वायनाडच्या जागेवरून भांडत होते. अशा परिस्थितीत राहुल उमेदवार बनत आहेत. ही राहुल गांधींच्या दृष्टीने एक जोखीम आहे,
केरळमधील वायनाड, कोळिक्कोड आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यात पसरलेला हा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते टी. सिद्दीकी यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला होता. मात्र राहुल यांच्या घोषणेनंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आणि राहुल यांचे स्वागत केले. वायनाड हा मतदारसंघ 2009 साली निर्माण झाला. त्यानंतर दिवंगत नेते एम. आय. शानवाज यांनी त्याला काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला बनविला.

राहुल हे काँग्रेसचे सेनापती. हे सेनापतीच रणांगणात जाऊन सोडा, स्वतःच्या बालेकिल्ल्यात लढण्यासही जर कचरत असतील तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात लढण्याची ऊर्मी कुठून येणार. म्हणूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे असले पाऊल उचलून पक्षाने हात दाखवून अवलक्षण केले आहे.

Leave a Comment