कमल हसन लढवणार नाही लोकसभा निवडणूक

kamal-hasan
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे अभिनेता- राजकारणी कमल हसन यांनी जाहीर केले असून त्यांनी ही माहिती त्यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या पक्षाचे घोषणापत्र आणि उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करताना दिली. माझेच चेहरे सर्व उमेदवार असून रथात बसण्यापेक्षा रथ ओढण्यात मला अधिक रस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कमल यांनी आपल्या घोषणापत्रात नोकऱ्या, महिलांना समान पगार आणि आरक्षण तसेच, शेतकऱ्यांना १०० टक्के नफा यांची मोठी आश्वासने दिली आहेत. ५० लाख नोकऱ्यांच्या संधी आणि महिलांना ५० टक्के आरक्षण देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, पुरुषाच्या बरोबरीने महिलांना पगार देण्यात येईल, असे ते म्हणाले. त्यांनी राज्याचे राज्यपाल आमदारांकडून निवडले जातील, असे चक्रावून टाकणारे वचन दिले आहे. याशिवाय, मोफत वायफाय, टोलमुक्त महामार्ग, लोकांच्या धान्य घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था अशी अनेक आश्वासने दिली आहेत.

एमएनएमने तमिळनाडूतील पुदुच्चेरी येथे या आठवड्याच्या सुरुवातीला २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी त्यांनी स्वतःही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. माझी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, याबाबत पक्षच निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment