छप्पन इंच विरुद्ध छप्पन पक्ष!

devendra-fadanvis
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची पहिली अधिकृत प्रचार सभा रविवारी कोल्हापूर येथे झाली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मार्मिक विधान केले. देश चालवण्यासाठी 56 पक्षांची युती नव्हे तर 56 इंचाची छाती लागते, असे ते म्हणाले. “महायुतीला विरोध करायला 56 पक्ष एकत्र आले आहेत पण अजूनही त्यांच्यात भांडणे चालू आहेत. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत पण विरोधकांचे कोण आहेत हा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले. गोष्ट खरी आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती झाली असून दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला अजूनही सूर सापडत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढविण्याचे खूप आधी नक्की केले होते, मात्र प्रत्येकी किती जागा लढवायच्या यावर संदिग्धता कायम होती. या संदर्भात बरीच ओढाताण झाली, खूप घासाघीस झाली. अखेर रात्र थोडी नि सोंगे फार अशी वेळ आली तेव्हा कसे बसे जागावाटप झाले. मात्र भाजप-शिवसेनेला पछाड देण्यासाठी या दोघांनी आणखी अनेक पक्षांची खोगीरभरती केल्यामुळे तर परिस्थिती आणखीच वाईट झाली. अनेक मतदारसंघात आपले उमेदवार बदलण्याची आणि माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा आहेत 48. आता नवीन सूत्रानुसार काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहेत. दोन्ही पक्षांनी सहकारी पक्षांसाठी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी 2 जागा सोडल्या आहेत. सोडण्यात येणाऱ्यांपैकी दोन जागा राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळतील. शेट्टी यांनी गेल्या वेळेस भाजप-शिवसेना सोबत निवडणूक लढली होती. पालघरची जागा काँग्रेस बहुजन विकास आघाडीसाठी सोडणार आहे, तर रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीसाठी राष्ट्रवादी एक जागा सोडणार आहेत. म्हणजेच प्रत्यक्षात 24 आणि 20 अशा जागा त्यांच्या पदरात पडतील.

काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी मिळून एक मोठा खेळ मांडला आहे, हे तर मानायलाच पाहिजे. भारताच्या राजकारणात हा खेळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र त्याचे प्रमाण या आघाडीने एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ऐकून दचकायला होईल, असा पक्षांचा आकडा या आघाडीत आहे. तब्बल 56! यापैकी अनेक राजकीय पक्षांना मान्यताही मिळालेली नाही, म्हणजेच त्या केवळ संघटना आहेत.

आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवर ज्या राजकीय आघाड्या होतात त्यात 40-50 पक्ष असणे ही काही नवी गोष्ट नाही. सध्याच्या केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) 48 पक्ष आहेत. आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) सुद्धा जवळपास एवढेच पक्ष होते. यातील अनेक राजकीय पक्ष छोट्या राज्यांतील होते. मात्र ते राष्ट्रीय पातळीवर होते आणि कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भल्या मोठ्या संख्येतील आघाडी उभी राहिली नव्हती. महाराष्ट्राला एक वेगळाच अनुभव या आघाडीच्या रूपाने मिळणार आहे.

यातील गंमत अशी, की या 56 पैकी केवळ पाच पक्षांचा अपवाद करता अन्य पक्ष निवडणुकीत असणारही नाहीत. आता राजकारणात फायदा झाल्याशिवाय तर कोणी काही करत नाही. मग हे 51 पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी पालखी उचलायला का तयार झालेत? त्यांची नजर मुळात या निवडणुकीवर नाहीच. तर राज्यात लोकसभेपाठोपाठ सहा महिन्यांनी विधानसभची निवडणूक आहे. त्यावेळेस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पंगतीत बसण्यासाठीची ही त्यांची तयारी आहे.

राज्याच्या काही विवक्षित भागांमध्ये प्रभाव असलेले अनेक छोटे पक्ष व संघटना आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास अघाडी, शेतकरी कामगार पक्ष, मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी पक्ष, शिव संग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, भारीप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ति संघ अशी अनेक नावे घेता येतील. त्यातही एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांनी मिळून एक नवी आघाडी रचली आहे. त्यांचा अपवाद करूनही अनेक राजकीय बंडखोर आणि नाराजांनी स्वतःचे तथाकथित पक्ष काढले आहेत. आपला स्वतंत्र तंबू ठोकून राजकीय दुकान चालवणे हे त्यांचे मुख्य काम. विधानसभेत एखादी जागा मिळाली, तरी आपले काम झाले ही त्यांची भूमिका आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दृष्टीनेही हा फायद्याचा सौदा आहे. त्यांना सध्या काही हात उचलून द्यायचे नाही. या सर्व पक्षांची ताकद कमी जास्त आहे, मात्र आपापल्या भागात त्यांनी पांच-पचीस हजार मतांचा फायदा करून दिला तरी त्यांच्या दृष्टीने ते पुरेसे आहे. अर्थात राजकारणात याचे बरोबर, त्याचे असे काही नसते. ही आघाडी करून काँग्रेस-राष्ट्रवादीने शहाणपणाचा सौदा केला आहे, इतकेच सांगता येईल.

त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याभोवती फिरणारी भाजपची प्रचार मोहीम आणि दुसरीकडे छोट्या छोट्या शक्तींना एकत्र करून दिलेली झुंज अशी ही निवडणूक असणार आहे. छप्पन इंच विरुद्ध छप्पन पक्ष असा हा सामना रंगणार आहे. आता हे एकीचे फळ काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार का किंवा एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होणार, हे पाहण्यासाठी 23 मेची वाट पाहावी लागणार!

Leave a Comment