मायक्रोवेव्ह चॅलेंज – ट्वीटर वरील सध्याचा नवा ट्रेंड

twitter
एखाद्या गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला की सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा ट्रेंड केवळ त्या देशातच नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये वेगाने पसरू लागतो. मग तो ट्रेंड काही वर्षांपूर्वीचा आईस बकेट चॅलेंज असो, किंवा अगदी अलीकडच्या काळातील ‘ट्रँगल डान्स चॅलेंज’ असो, एखाद्याच्या कल्पकतेतून अशा काही ट्रेंड्स निर्माण झाल्या, की त्या लोकप्रिय होण्याला फारसा अवधी लागत नाही. काही दिवसांपूर्वी ‘टिक टॉक’ या सोशल पेजवर सुरु झालेले मायक्रोवेव्ह चॅलेंजचे लोण आता ट्वीटरवर ही झपाट्याने पसरत चालले आहे.
twitter1
हे चॅलेंज स्वीकारणाऱ्याने जमिनीवर बसून हात किंवा पावले जमिनीला न टेकवता, आणि हातापायांची अजिबात हालचाल न करता मायक्रोवेव्ह मधील गोल फिरणाऱ्या काचेच्या ‘टर्न टेबल’ प्रमाणे जमिनीवर बसून गोलगोल फिरायाचे असते. त्याचबरोबर ‘स्लो डान्सिंग इन द डार्क’ या गाण्याच्या तालावर हे चॅलेंज पूर्ण करायचे असते. गेल्या महिन्यामध्ये ‘टिक टॉक’ या सोशल साईटवर @djtaylortot नामक युजरने हे चॅलेंज अपलोड करीत व्हिडियो प्रसिद्ध केला असून, त्यानंतर हे चॅलेंज ट्वीटरवर ही झपाट्याने लोकप्रिय होत असलेले पहावयास मिळत आहे. अनेकांनी या चॅलेंजचा स्वीकार करून आपापले व्हिडियो ट्वीटर वर अपलोड केले असून, त्यावर हजारो प्रतिक्रिया देखील पहावयास मिळत आहेत.
twitter2
या नव्या ट्रेंडच्या आधी ‘ट्रँगल डान्स’ नेटीझन्समध्ये फारच लोकप्रिय होता. तिघांनी मिळून करण्याच्या या नृत्याचे फॅड ऑस्ट्रेलियापासून, अमेरिका, स्पेन, आणि अगदी भारतामध्येही पहावयास मिळत होते. हा डान्स पहावयास सोपा वाटत असला तरी तसा तो खचितच नव्हता आणि हा करताना सर्व मंडळींची चांगलीच दमछाक होत असल्याने याला ‘कॅलरी बर्निंग डान्स’ किंवा ‘वेस्टर्न फुगडी’ असे ही म्हटले गेले होते.

Leave a Comment