तिबेटमधून भारतापर्यंत असे आले चवदार ‘मोमो’

momo
पारंपारिक भारतीय पदार्थ, तसेच पिझ्झा, पास्ता आणि बर्गरच्या जोडीने मोमो हा खाद्यप्रकारही भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. लहानांपासून वयस्क मंडळींपर्यंत सर्वांनाच आवडणारा आणि शाकाहारी व मांसाहारी व्हरायटीमध्ये उपलब्ध असणारा असा हा चवदार पदार्थ आहे. अगदी मोठमोठ्या मॉल्स, रेस्टॉरंट्स पासून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या टपरीपर्यंत हा पदार्थ सर्वत्र उपलब्ध असतो आणि चवीने खाल्ला ही जातो. पण वास्तविक हा पदार्थ भारतीय नसून हा पदार्थ तिबेट देशातून इथे आलेला आहे. चीनी खाद्यसंस्कृतीमधील ‘डीमसम’ या पदार्थाशी मिळता जुळता असणार हा पदार्थ नेपाळमार्गे भारतामध्ये आला असल्याचे म्हटले जाते.
momo1
सुरुवातीला केवळ उत्तर-पूर्वी राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळणारा हा पदार्थ कालांतराने सर्व भारतामध्ये प्रसिद्ध झाला. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या पहाडी राज्यांमध्ये स्थायिक झालेल्या तिबेटन लोकांमध्ये मोमो हा पदार्थ अतिशय लोकप्रिय असून इथे हा काहीसा वेगळ्या प्रकारे बनविला जातो. मोमो या मूळच्या तिबेटी पदार्थावर मंगोल खाद्यसंस्कृतीची छाप आहे. मोमो या शब्दाचा अर्थ ‘वाफेवर शिजविलेला (पदार्थ)’ असा असून, तिबेटची राजधानी ल्हासामध्ये या पदार्थाचा जन्म झाल्याचे म्हटले जाते. मात्र जसजसा हा पदार्थ इतर प्रांतांमध्ये पोहोचला तसतशी हा पदार्थ बनविला जाण्याची पद्धतही बदलत गेली. तिबेटन व्यापारी जेव्हा व्यापाराच्या निमिताने देशाटन करीत असत, तेव्हा त्यांच्या मार्फत हा पदार्थ नेपाळमध्ये आणि त्यानंतर भारतामध्ये आला.
momo2
मोमो हा पदार्थ मांसाहारी (चिकन, मटन, पोर्क इ.)सारण वापरून बनविला जातो, किंवा मोहोरीची पाने, कोबीची पाने इत्यादींपासून तयार केलेले शाकाहारी सारण भरून, वाफेवर शिजवून बनविला जातो. अलीकडच्या काळामध्ये फ्राईड मोमो देखील अतिशय लोकप्रिय होत असून, ‘ताईपो’ नामक आकाराने सामन्य मोमो पेक्षा मोठा असा हा मोमोचा प्रकार मोजक्या ठिकाणी उपलब्ध असला तरी लोकप्रिय आहे.

Leave a Comment