सुरक्षित बँक ऑफ इंग्लंडच्या व्हॉल्टमध्ये जमिनीखालून कसा शिरला हा कामगार !

bank
बँक ऑफ इंग्लंड ही केवळ युरोपमधीलच नाही, तर जगातील काही नामांकित आणि जुन्या आर्थिक संस्थांपैकी एक आहे. ब्रिटनमध्ये आर्थिक स्थैर्य राखण्याची जबाबदारी या बँकेने वर्षानुवर्ष चोख पार पाडली आहे. १७३४ सालापासून कार्यरत असलेल्या या बँकेच्या इमारतीचा विस्तार ३.४ एकर क्षेत्रामध्ये असून, लंडनच्या ‘थ्रेड नीडल स्ट्रीट’वर ही बँक आहे. या बँकेची इमारत बँकेच्या प्रतिष्ठेला साजेशी आहेच, पण त्याहूनही महत्वाची बाब ही, की या इमारतीच्या खाली बँकेचा सोन्याचा साठा असलेले आठ मजबूत ‘व्हॉल्ट्स’, म्हणजेच स्ट्रॉँग रूम्स आहेत.
bank1
इतका मोठा सोन्याचा साठा या बँकेमध्ये असल्याने बँकेच्या सुरक्षिततेचा विचार करून या बँकेच्या भिंती आठ फुट जाडीच्या बांधण्यात आल्या असून बँकेमध्ये ज्या ठिकाणी हे सोने ठेवण्यात आले आहे त्या व्हॉल्ट्सला असलेल्या खास कुलुपांच्या किल्ल्या देखील फुटभर लांबीच्या असल्याचे म्हटले जाते. आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून या व्हॉल्स्ब मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ‘व्हॉईस रेकग्निशन’ प्रणालीचा वापर करण्यात येत असतो. तसेच बँकेच्या सुरक्षिततेसाठी इतरही अद्ययावत सुविधांचा वापर आता करण्यात येत आहे. ‘द इंडीपेंडंट’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या बँकेमध्ये असलेल्या सोन्याच्या साठ्याची किंमत शंभर बिलियन पाउंड्सपेक्षाही अधिक असून, ‘न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह’ पाठोपाठ सर्वाधिक सोन्याचा साठा असणारी जगातील ही दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे.या बँकेमधील सोन्याचा साठा, सोन्याच्या विटांच्या रूपात असून, प्रत्येकी बारा किलो वजनाच्या एकूण ४००,००० सोन्याच्या विटा या साठ्यामध्ये असल्याचे समजते. या साठ्याचे एकत्रित वजन ५,१३४ टन असून, या वजनाखाली जमीन दबू नये यासाठी हा साठा आठ निरनिराळ्या व्हॉल्स्समध्ये ठेवण्यात आल्याचे समजते.
bank2
गेल्या ३२५ वर्षांच्या इतिहासामध्ये इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या या बँकेमध्ये चोरी करण्यास कोणीही धजाविले नसल्याचा सार्थ अभिमान बँक व्यवस्थापनाला असला, तरी १८३६ साली मात्र एका सर्वसामान्य ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्ती कामगाराने बँक अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला होता. ही घटना बँकेच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध केली गेली आहे. झाले असे, की १८३६ साली एके दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे एक निनावी पत्र आले. यामध्ये बँकेमध्ये असलेल्या सोन्याच्या साठ्यापर्यंत आपण सहज पोहोचू शकत असल्याचे पत्र लिहिणाऱ्याने म्हटले होते. सुरुवातीला हे पत्र कोणी तरी निव्वळ चेष्टेपायी लिहिले असल्याचे वाटून अधिकाऱ्यांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केले. पण काही काळानंतर पुन्हा एक निनावी पत्र येऊन त्यामध्ये पत्राच्या लेखकाने आपण बँक अधिकाऱ्यांना, ज्या व्हॉल्ट्समध्ये सोन्याचे साठे आहेत, तिथे प्रत्यक्ष येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
bank3
बँकेच्या व्हॉल्टमध्ये एखादी व्यक्ती अनधिकृतरित्या शिरू शकणे केवळ अशक्य असल्याची खात्री जरी बँकेच्या अधिकाऱ्यांना असली, तरी या पत्रामध्ये लिहिलेल्या मजकुराची खातरजमा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये लिहिलेल्या वेळेला व्हॉल्टमध्ये उपस्थित राहून काय घडते आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे अधिकारी ठरल्या वेळेला ठरल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना जमिनीवरील फरश्या सरकविल्या गेल्याचा आवाज ऐकू आला आणि अकस्मात एक इसम जमिनीच्या खालून अधिकाऱ्यांच्या समोर प्रकटला. त्याला पाहून स्तिमित झालेल्या अधिकाऱ्यांनी त्या इसमाची चौकशी केली असता आपण ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करणारे कामगार असल्याचे त्याने सांगितले. ज्या रस्त्यावर या बँकेची इमारत होती, त्याच रस्त्यावर ड्रेनेज पाईपलाईन्सच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी नेहमीप्रमाणे पाईपलाईन्सचे इन्स्पेक्शन करीत असताना एक वापरात नसलेली, जुनी ड्रेनेज पाईपलाईन सरळ बँकेच्या व्हॉल्टच्या खाली निघत असल्याचे त्याच्या लक्षात आले. या ड्रेन पाईपमधून या कामगाराने जमिनीच्या खालून सरळ व्हॉल्टमध्ये अगदी सहजगत्या प्रवेश मिळविला. ही सर्व माहिती या कामगाराने बँक अधिकाऱ्यांना देऊन, सोन्याच्या साठ्याच्या इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेमध्येही त्रुटी राहून गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. कामगाराने आपले म्हणणे बँक अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर बँकेतील सर्व सोन्याचा साठा सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यासाठी विश्वासू बँक कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. सर्व साठा सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर बँक व्यवस्थापनाच्या वतीने इतकी महत्वाची बाब बँकेच्या लक्षात आणून दिल्याबद्दल कौतुक करून या कामगाराला आठशे पौंड रक्कम इनाम देण्यात आली.

Leave a Comment