अंत्यसंस्कार काही सेकंद उशीराने उरकल्याने मृतकाच्या परिवाराला दंड !

funeral
इंग्लंडमधील नॉर्थ ईस्ट लिंकनशायर भागातील ग्रीम्स्बी गावामध्ये आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी दहनभूमीमध्ये आलेल्या एका परिवाराला दंड करण्यात आला. हा दंड करण्यामागे कारण हे, की अंत्यविधी संस्कार संपवून दहनभूमीच्या बाहेर पडण्यास या अंत्यविधी संस्कारासाठी उपस्थित असणाऱ्या मंडळींनी नियोजित समय सीमेपेक्षा चौदा सेकंद जास्त वेळ घेतला. अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एक व्यक्ती अतिशय वृद्ध असून काठीच्या आधाराने सावकाश चालणाऱ्या या व्यक्तीला दहनभूमीच्या बाहेर पडण्यास थोडासा जास्त अवधी लागला, आणि याचे परिणाम म्हणून मृतकाच्या परिवाराला दोनशे पाउंड्स दंड म्हणून भरावे लागले. ग्रीम्स्बी दहनभूमीमध्ये अंत्यविधी संस्कारासाठी प्रत्येक परिवाराला चाळीस मिनिटांचा अवधी दिला जातो.
funeral1
नॉर्थ ईस्ट लिंकनशायर कौन्सिलने अशा प्रकारचे दंड आकारण्यासंबंधी नियमावली जारी केली असून, त्यानुसार अंत्यविधी सुरु करण्यासाठी आणि संपविण्यासाठी प्रत्येक परिवाराला निश्चित समयसीमा दिली जात असते. या वेळेचे पालन काटेकोरपणे केले जाण्याबद्दल कौन्सिल अतिशय आग्रही आहे. त्यामुळे ज्या परिवाराकडून कोणत्याही कारणास्तव या वेळांचे पालन केले जात नाही, त्यांना ठरल्या वेळेपेक्षा काही सेंकद जरी जास्त उशीर झाला, तरी कौन्सिलच्या वतीने दंड ठोठाविण्यात येत आहे. तसेच अंत्यविधीची सर्व व्यवस्था करणाऱ्या ‘फ्युनरल डायरेक्टर्स’ना देखील अंत्यविधी ठरल्या वेळेपेक्षा उशीराने सुरु झाल्यास दंड ठोठावण्यात येत आहे.
funeral2
या नियमांच्या बाबतीत नागरिकांनी व अंत्यविधीची व्यवस्था करणाऱ्या फ्युनरल डायरेक्टर्सनी नाराजी व्यक्त केली असून, अनेकदा सर्व व्यवस्था चोख असूनही काही कारणाने अंत्यविधीसाठी थोडा उशीर होणे टाळता येत नसल्याचे म्हटले आहे. एका फ्युनरल डायरेक्टरने या बाबतीत आपल्या अनुभव कथन करताना सांगितले, की अंत्यविधीसाठी वेळेवर पोहोचूनही, त्यापूर्वी पार पडलेल्या अंत्यविधीसाठी उपस्थित असलेली मंडळी जास्त असून, त्यांना चर्चबाहेर पडण्यास वेळ लागला. साहजिकच या फ्युनरल डायरेक्टरला मृतकाचे पार्थिव असलेली शववाहिका घेऊन चर्चमध्ये पोहोचण्यास पाच मिनिटे विलंब झाला. त्यावेळी त्यालाही हा विलंब झाल्याने दंड भरावा लागला होता.
funeral3
ही अजब नियमावली नागरिकांच्या पचनी पडत नसून, आधीच आपल्या परिवारातील एक सदस्य गमविल्याच्या दुःखात असलेल्या परिवाराकडून अशा प्रकारचे दंड वसूल करणे असंवेदनशीलपणाचे लक्षण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ठरल्या वेळेपेक्षा उशीराने संपलेल्या अंत्यविधीसाठी दंड आकारला जात आहे, त्याचप्रमाणे ठरल्या वेळेपेक्षा लवकर संपलेल्या अंत्यविधीसाठी संबंधित परिवाराला खास सवलत का देत नाही असा ही सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment