तळीराम अमेरिकन नागरिक करतात या गोष्टींवर सर्वाधिक खर्च

drink
अमेरिकेमध्ये केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०१८ सालामध्ये अमेरिकन नागरिकांनी मद्याच्या धुंदीमध्ये केलेल्या खरेदीवर तब्बल ३९.४ बिलियन डॉलर्सची रक्कम खर्च केली आहे. ‘finder.com’ आणि ‘प्युअरप्रोफाईल’ यांच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणानुसार मद्याच्या धुंदीत असताना अमेरिकन नागरिकांनी अनेक गोष्टींवर पैसे खर्च केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अन्नपदार्थांवर सर्वाधिक खर्च झाल्याचे दिसून आले आहे. मद्याच्या धुंदीत असलेल्या सुमारे ५२% नागरिकांनी पिझ्झा, बर्गर्स, नूडल्स, सँडविचेस, फ्रेंच फ्राईज असल्या ‘टेक अवे’ पदार्थांवर आपण पैसे खर्च करीत असल्याचे म्हटले असून, सुमारे ४२% नागरिक मद्याच्या धुंदीमध्ये आपण नवे कपडे, आभूषणे आणि पादत्राणे यांवर पैसे खर्च केले असल्याचे म्हटले आहे. सुमारे ३३% नागरिकांनी मद्याच्या धुंदीमध्ये आपण आणखी मद्य किंवा सिगारेट्सवर पैसे खर्च केले असल्याचे म्हटले आहे.
drink1
मद्याच्या धुंदीमध्ये पैसे खर्च करीत असणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी प्रत्येकी सरासरी ४४७ डॉलर्स खर्च केले असून, हे प्रमाण २०१७ साली केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या प्रमाणाहून अधिक आहे. २०१७ साली मद्याच्या धुंदीमध्ये असलेल्या नागरिकांनी प्रत्येकी सरासरी २०६ डॉलर्स खर्च केले होते. मद्याची धुंदी उतरल्यानंतर खरेदी केलेल्या वस्तू आपण ‘रिटर्न’ म्हणजेच दुकानाला परत करून आपले पैसे परत घेतले असल्याची कबुलीही बहुतेकांनी दिली.
drink2
कपडे, खाद्यपदार्थ, प्रसाधने, पादत्राणे या वस्तूंची खरेदी मद्याच्या धुंदीमध्ये असताना केली जाण्याचे प्रमाण जास्त असले, तरी काही महाभागांनी आगळ्यावेगळ्या खरेद्याही केल्या असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. एका अमेरिकन नागरिकाने मद्याच्या नशेमध्ये एक मोर, एक डुक्कर, आणि एक भली मोठी पाल खरेदी केल्याचे म्हटले आहे, तर काहींनी नशेमध्ये असताना गाड्या खरेदी केल्या असल्याचेही म्हटले आहे. श्रीलंकेमध्ये भटकंतीच्या उद्देशाने आलेल्या एका अमेरिकन दाम्पत्याने मद्याच्या धुंदीत संपूर्ण हॉटेलच खरेदी केल्याचा किस्साही सोशल मिडीयावर चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

Leave a Comment