भाजपच्या शहेन’शहां’चा बालेकिल्ला गांधीनगर आहे तरी कसा?

amit-shah
भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या तिकिटयादीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली, की पक्षातील मार्गदर्शक मंडळाच्या नेत्यांना आता थेट वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ लालकृष्ण अडवानी यांच्याकडून काढून तो भाजप अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आला आहे. पक्ष संघटनेतून थेट सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्यास शहा हे सिद्ध झाले आहेत. त्यासाठी भाजपच्या या शहेनशहाने बालेकिल्ला निवडला तो गांधीनगरचा.

दस्तुरखुद्द अमित शहा हे रिंगणात उतरल्यामुळे गुजरातमध्ये भाजपला बळ मिळण्यास मदत होईल. भाजपचे राज्यातील नेते नुकतेच राज्यातील 26 जागांवरील उमेदवार ठरविण्यासाठी एकत्र आले होते. मात्र या बैठकीनंतरही त्यांनी गांधीनगरच्या या अतिमहत्त्वाच्या जागेचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवला होता. स्वतः अडवानी यांना निवडणुकीत आपले भाग्य अजमावण्याची इच्छा होती, मात्र भाजप नेत्यांनी अत्यंत कष्टाने त्यांची समजूत काढली. भाजपने खरे तर लालकृष्ण अडवानी यांच्या ऐवजी अमित शहा यांना गांधीनगरच्या जागेवरून उतरवून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

एक म्हणजे शहा यांना उमेदवार बनवून कार्यकर्त्यांना सक्रिय करणे सोपे होणार आहे. गुजरातेतील सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रातील अनेक जागा जिंकण्याच्या स्थितीत भाजप नाही, असे अनेक भाजप नेत्यांचे मत आहे. त्यामुळे भाजप अध्यक्षांनी निवडणूक लढविल्यास तो नकारात्मक परिणाम दूर करण्यास काहीशी मदत होईल. दुसरे म्हणजे एकीकडे येथील मतदारांना मते मागतानाच शहा हे देशभर फिरून अन्य उमेदवारांसाठीही प्रचार करू शकतील. कारण सहा खेपेस भाजपच्या उमेदवाराला डोळे झाकून जिंकून देणाऱ्या या मतदारसंघात त्यांना फारशी मेहनत करावी लागणार नाही.

अडवानी हे गांधीनगर येथून गेली तीन दशके निवडणूक लढवत आहेत. इतके की गांधीनगर हे नाव अडवानी यांना पर्यायवाचक बनले होते. गेल्या प्रत्येक निवडणुकांत त्यांचे या ठिकाणी विजयी होणे, ही केवळ औपचारिकता असायची. अडवानी यांनी 2014 मध्ये येथूनच कॉंग्रेसच्या किरीट पटेल यांचा 4 लाख 83 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. मात्र त्याही वेळी या मतदारसंघात आपल्याला दगाफटका होईल, अशी भीती तेव्हा त्यांना होती. म्हणून भोपाळ या दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाची मागणी त्यांनी केली होती. परंतु पक्षाच्या आदेशावरून त्यांनी अखेर गांधीनगरलाच आपला मतदारसंघ मानले आणि विजयीही झाले. “कराचीहून 1947 मध्ये स्थलांतर केल्यापासून मी गुजरातशी एकनिष्ठपणे जोडला गेलेलो आहे. मी राज्यसभेत आणि लोकसभेत या दोन्हीत राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गांधीनगर मतदारसंघातून 1991 पासून लोकसभेत मी निवडून जात आहे,” असे त्यांनी त्यावेळी एका निवेदनात म्हटले होते.

गुजरातच्या राजधानी गांधीनगरची लोकसभेची जागा कायम हाय-प्रोफाईल राहिली आहे. भाजपसाठी राज्यातील सर्वात सुरक्षित अशी ही जागा मानण्यात येते. भाजपला येथे सन 1989 पासून 2014 पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळत आलेला आहे. अडवानीच नव्हे तर शंकरसिंह वाघेलापासून (1989-91) अटलबिहारी वाजपेयीपर्यंत (1996-98) अनेक बड्या नेत्यांनी येथूनच विजय मिळविला आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 20 हजार मतदार असून त्यात पटेल 2.50 लाख, वणिक 1.45 लाख, ठाकोर 1.30 लाख आणि दलित 1.90 लाख मतदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात गांधीनगर उत्तर, साबरमती, नारणपुरा, घाटलोडिया, वेजलपुर, कलोल आणि साणंद अशा सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होते. यातील कलोल आणि गांधीनगर वेस्ट मतदारसंघ काँग्रेसकडे तर उरलेल्या पाच जागा भाजपकडे आहेत.

मात्र या दोन जागी आपले आमदार असूनही काँग्रेसला त्यांचा लाभ होईल अशी शक्यता नाही कारण शहरी भागातील नारणपुरा, साबरमती आणि घाटलोडिया हे मतदारसंघ भाजपचे गढ मानले जातात. परंतु साणंदचा काही जागा ग्रामीण भागात मोडत असल्यामुळे त्यात मते कमी-जास्त होतात. गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलन ऐन भरात असतानाही आणि घोटलोडिया, साबरमती व नारणपुरा हे विधानसभा मतदारसंघ पाटीदारांचे गढ मानले जात असतानाही भाजपला तेथे मोठे मताधिक्य मिळाले होते. (याच घोटलोडिया आणि नारणपुरा मतदारसंघांतून नरेंद्र मोदी यांचे दोन आमदार आनंदीबेन पटेल आणि अमित शहा हे 2012 मध्ये निवडून आले होते. पटेल पुढे मोदी यांच्या नंतर मुख्यमंत्री बनल्या तर शहा यांनी अडवानींची जागा घेतली आहे.)

म्हणूनच 2019चे विजय अभियान सुरू करताना अमित शहा यांनी गांधीनगर मतदारसंघाची निवड केली आहे. गंमतीची गोष्ट अशी, की अडवानी यांच्या आरंभीच्या निवडणुकीचे व्यवस्थापन शहा यांच्याकडेच असायचे. गुजरातेत दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जोमदार कामगिरी पाहता शहा यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांत नवीन ऊर्जा संचारण्यास मदत होईल. त्यामुळे संपूर्ण राज्यात एक प्रकारचे उत्सवी वातावरण निर्माण करणे सोपे होईल, असा पक्षाचा होरा आहे. तो खरा ठरतो का नाही, हे 23 मे रोजी कळेल.

Leave a Comment