मुकेश अंबानींचा ‘सख्खा भाऊ पक्का सौदा’

ambani
रिलायन्स उद्योगातील एका भागाचे मालक आणि आपले धाकटे बंधू अनिल अंबानींना ऐन मोक्याच्या क्षणी संकटातून बाहेर काढून मुकेश अंबानी यांनी गेल्या आठवड्यात सर्वांची वाहवा मिळविली. अखेर भाऊच भावाच्या मदतीला धावला, रक्ताच्या नात्याने व्यावसायिक स्पर्धेवर मात केली अशा प्रकारची भाष्ये अनेकांनी केली. मात्र या सर्व गोंधळात एक गोष्ट गुलदस्त्यात राहिली आणि ती म्हणजे अनिल यांना मदत करून धंदेवाईक बुद्धीचेही प्रदर्शन केले आहे.

एरिक्सन एबी या स्वीडीश कंपनीच्या एका स्थानिक युनिटला देय रक्कम देण्यासाठी 80 लाख अमेरिकन डॉलर्सची भरपाई करण्यास असमर्थ ठरल्यामुळे अनिल अंबानी यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता होती. सोमवारी ऐनवेळी हस्तक्षेप करून मुकेश यांनी ते संकट दूर केले. मुकेश यांच्या या पावलामुळे अनिल अंबानींना मोठाच दिलासा मिळाला. आपल्या थोरल्या भावाकडून आलेल्या या मदतीबद्दल अनिल यांनी त्यांचे तोंडभरून आभारही मानले. ”या अडचणीच्या प्रसंगात माझी साथ देण्यासाठी माझा थोरला भाऊ मुकेश आणि त्याची पत्नी नीता यांचे मी मनापासून आभार मानतो. या अडचणीच्या वेळी कौटुंबिक मूल्यांची साथ देणं किती महत्त्वाचं असतं हेच त्यांनी दाखवून दिले,” असे म्हणत अनिल यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

परंतु हे खरोखरच कौटुंबिक मीलन होते की तद्दन धंदेवाईक चाल? तर याचे उत्तर ही एक उत्तम व्यावसायिक चाल हेच आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण ज्या दिवशी मुकेश यांनी ही मदत केली, त्याच दिवशी मुकेशनी अनिल यांची तुरुंगवारी टाळतानाच त्यांच्याशी झालेला एक करार रद्द केला. अनिलच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लि. (आरकॉम) या कंपनीची मालमत्ता विकत घेण्यासाठीचा हा करार दोन्ही भावांनी डिसेंबर 2017 मध्ये केला होता. या करारामुळेच अनिल यांना आतापर्यंत दिवाळखोरीची कारवाई टाळण्यात यश आले आहे.

आरकॉम कंपनी तोट्यात असल्यामुळे ती आता दिवाळखोरीकडे वाटचाल करणार, हे नक्की आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली या कंपनीची मालमत्ता लिलावात काढण्यात येईल तेव्हा मूळ किमतीपेक्षा अत्यंत कमी किमतीत मुकेश ती मालमत्ता विकत घेऊ शकतील. एरिक्सन कंपनीचे देणे दिले असले तरी अन्य अनेक बँकांचे आरकॉमकडे 7 अब्ज डॉलरचे येणे आहे. त्याच्या वसूलीसाठी लिलाव होण्याची शक्यता आहे. देशातील दिवाळखोरी कायद्यांच्या अंतर्गत आपल्या सर्व कर्जांची परतफेड करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आरकॉमने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या मालमत्तांमध्ये आरकॉमच्या एअरवेव्हज्, टॉवर आणि फायबर यांचा समावेश आहे. अंबानी बंधूंमध्ये झालेल्या करारानुसार मुकेश अंबानी या मालमत्तेसाठी 173 अब्ज रुपये देणार होते, मात्र आता त्यांना एवढी रक्कम द्यावी लागणार नाही. याचे कारण म्हणजे सध्या रिलायन्स जिओ वगळता अन्य सर्व दूरसंचार कंपन्यांची अवस्था नाजूकच आहे. त्यामुळे लिलावात त्या जिओशी स्पर्धा करू शकणार नाहीत. आरकॉमच्या या मालमत्ता विकत घेण्यासाठी भारती एअरटेलची उपकंपनी असलेल्या भारती इन्फ्रोटेल लि. आणि कॅनडातील ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंट या कंपन्यांनी रस दाखविला आहे, असे सांगितले जाते. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या आपल्या पालक कंपनीच्या पेट्रोकेमिकल्स आणि तेल शुद्धीकरण व्यवसायांतून भक्कम नफा मिळत असल्यामुळे जिओला निधी पुरवठ्याची किंचितही चिंता नाही.

“भारतातील दूरसंचार क्षेत्र भयंकर तोट्यात सुरू असून यामुळे या लिलावातील बोली कमी राहतील. त्यामुळे आरकॉमच्या स्पेक्ट्रमची खरेदी करण्यासाठी जिओला कमी खर्च करावा लागेल, असे ब्लूमबर्ग इंटेलिजन्स कंपनीचे विश्लेषक कुणाल अग्रवाल यांनी 19 मार्च रोजी लिहिलेल्या टिपणात म्हटले होते.

जिओ कंपनीने 2016 मध्ये दूरसंचार बाजारपेठेत प्रवेश केला. तिच्या मोफत सेवेमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना किंमत युद्धात उडी घ्यावी लागली. त्यातील काहींनी बाजारपेठेतून काढता पाय घेतला, काही कंपन्या विलीन झाल्या तर काही दिवाळखोर झाल्या. व्होडाफोन आयडिया लि. ही भारतातील क्रमांक एकची मोबाईल कंपनी आहे मात्र तीसुद्धा तोट्यात आहे. आरकॉमही याच स्पर्धेची बळी ठरली. तिच्या मालमत्तेसाठी भावाला मदत करून मुकेश यांनी सख्खा भाऊ पक्का सौदा केला आहे. याला म्हणतात व्यापारबुद्धी!

Leave a Comment