विवाह करत आहात? तत्पूर्वी आपल्या जोडीदाराशी या विषयांवर जरूर करा चर्चा

couple
विवाहाचा निर्णय हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो. या निर्णयाने विवाहसंबंधामध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींची आयुष्ये खूपच प्रभावित होत असतात. त्यामुळे या बंधनात अडकण्यापूर्वी काही महत्वाचे निर्णय परस्परांशी चर्चा करुन घेणे आवश्यक असते. विवाहानंतर या गोष्टींवरून मतभेद, समज-गैरसमज होण्यापेक्षा वेळीच चर्चा करून काही निर्णय आधीपासूनच घेणे अगत्याचे आहे. पूर्वीच्या काळी मुलांचा विवाह करण्याचा, त्यांच्यासाठी योग्य जोडीदार कोण असेल, याबाबतचा निर्णय पालकांचा आणि इतर कुटुंबियांचा असे. पण बदलत्या काळाबरोबर ही संकल्पना ही बदलली आहे. आजच्या काळामध्ये तरुण-तरुणी शिक्षित, स्वावलंबी आणि प्रगत विचारांचे असल्याने आपल्या जीवन पद्धतीशी आणि विचारसरणीशी जुळवून घेणारा जोडीदार त्यांना हवा असतो, आणि ते योग्य ही आहे. म्हणूनच काही गोष्टींबद्दल जोडीदाराची मते जर विवाहापूर्वी जाणून घेतली, तर भविष्यामध्ये या गोष्टींवरून वाद आणि मनभेद टाळता येतात.
couple
आजकाल तरुण-तरुणी दोघेही चांगले शिकलेले असून, दोघेही बहुधा नोकरी-व्यवसाय करणे पसंत करतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दोघेही इतरांवर अवलंबून असत नाहीत. विवाहापूर्वी आपण कमाविलेले पैसे कसे खर्च करायचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असते. मात्र विवाह झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात आणि या जबाबदाऱ्या दोघांच्या ही असतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक बनते. त्यामुळे विवाहानंतर कोणत्या आर्थिक जबाबदाऱ्या कोणी घ्यायच्या याची चर्चा वेळेवर होणे आवश्यक आहे. तसेच आपल्या जोडीदाराने कोणते कर्ज घेतले असल्यास, किंवा इतर आर्थिक गुंतवणूक केली असल्यास त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. घरासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी घेतले जाणारे कर्ज, दोघांच्या परिवारांच्या पैकी कोणत्याही परिवाराला केली जाणारी आर्थिक मदत यांचे नियोजन करणे आणि शिवाय घरखर्च आणि इतर लहान मोठे खर्च यांची तजवीज कशी असावी याचेही नियोजन करणे महत्वाचे आहे.
couple4
विवाहानंतर अपत्ये असावीत किंवा नाही, आणि ती विवाहानंतर किती काळाने होऊ द्यावीत याबद्दलही नवपरिणीत दाम्पत्याने चर्चा करणे आवश्यक आहे. आजकाल पुष्कळ दाम्पत्ये अशी ही आहेत जी स्वखुशीने मुले जन्माला न घालण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे काही दाम्पत्यांसाठी अपत्य जन्माला घालण्याआधी आर्थिक स्थिरता महत्वाची ठरू लागली आहे, जेणेकरून अपत्यासोबत येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना आर्थिक अडचणी येणार नाहीत. त्यामुळे या विषयावर आपल्या जोडीदाराचे मत जाणून घेणे आवश्यक आहे.
का वाढतेय लग्नाचे वय?
आजकाल नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशी बदल्या होणे, किंवा सततचा प्रवास अनेकांसाठी अपरिहार्य होऊ लागला आहे. त्यामुळे पती-पत्नी यांच्यापैकी कोणाची फिरतीची नोकरी असल्यास दुसऱ्याने एके ठिकाणीच राहायचे की आपली नोकरी सोडून जोडीदाराबरोबर जायचे हा ही महत्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. विवाहाच्या सुरुवातीला जरी नोकरीच्या निमित्ताने दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला, तरी हा निर्णय महत्वाचा असून, तो कायमस्वरूपी असावा, किंवा नाही याबाबत चर्चा करणे आवश्यक ठरते. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाणे आवश्यक आहे.

भारतातील विवाहांच्या कांही विचित्र पद्धती

Leave a Comment