वेल स्ट्रीट – इंग्लंडमधील सर्वाधिक चढाचा रस्ता

london
सुमारे बावीस अंशांचा ‘ग्रेडीयंट इन्क्लाइन’ असलेला ‘वेल स्ट्रीट’ हा ब्रिस्टोल परिसरातील टॉटरडाऊन गावातील रस्ता, संपूर्ण इंग्लंडमध्ये सर्वाधिक चढ असलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टुमदार घरे असून, ब्रिस्टोल टेम्पल मीड्स रेल्वे स्टेशन पासून सुमारे वीस मिनिटांच्या अंतरावर हा रस्ता आहे. या रस्त्यावरून चढत वरपर्यंत पोहोचताना चांगल्या-चांगल्यांना धाप लागते. या रस्त्याचा चढ इतका जास्त आहे, की या रस्त्यावर गाड्या पार्क करताना त्या रस्त्याच्या समांतर पार्क करताच येऊ शकत नाहीत.
london1
रस्त्याच्या समांतर गाड्यांचे पार्किंग केल्यास गाड्या उतारावरून घरंगळत खाली जाण्याच्या धोका असल्याने गाड्या रस्त्यावर अशा पद्धतीने पार्क केल्या जातात, की जेणेकरून त्या उतारावरून हलू शकणार नाहीत. तसेच बर्फवृष्टीच्या दिवसांमध्ये पार्क केलेल्या गाड्या बर्फामुळे घसरून हलू नयेत या करिता अनेक जण आपल्या गाड्या रस्त्यावरील दिव्यांच्या खांबाला साखळ्यांनी बांधून ठेवतात.
london2
हा रस्ता सर्वाधिक चढाचा रस्ता असला, तरी अनेक उत्साही मंडळी या रस्त्यावरून येणे जाणे पसंत करतात. सायकलिस्ट आणि धावपटू मंडळींसाठी हा रस्ता एक आगळेच आव्हान असल्यामुळे आपली शारीरिक क्षमता तपासून पाहण्यासाठी ही मंडळी येथे आवर्जून फेरफटका मारत असतात.
london3
या व्यतिरिक्त या रस्त्याची आणखी एक खासियत म्हणजे दरवर्षी येथे साजरी होणारी ‘इस्टर एग’ शर्यत. दरवर्षी इस्टरच्या सणानिमित्त सजविलेली अंडी घेऊन या गावाचे नागरिक रस्त्याच्या वरपर्यंत जातात, आणि तिथून आपापली इस्टर एग्ज उतारावरून खाली सोडून देतात. ज्याचे इस्टर एग न मोडता सर्वाधिक उतार पार करेल तो या शर्यतीचा विजेता ठरतो.

Leave a Comment