निवडणुकीची उत्सुकता – अडवानींचे काय होणार?

lalkrishna-advani
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या 250 उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, अशी चर्चा आहे. या यादीतील अनेक नावे धक्कादायक असतील, तर यादीत नसलेलीही अनेक नावे धक्का देऊन जातील. मात्र त्यात खरी उत्सुकता असेल ती ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे काय होणार ही!

भाजपच्या तिकिट वाटप प्रक्रियेत अनेक दिग्गजांची तिकिटे कापली जातील, असे बोलले जाते. मागील निवडणुकीनंतर 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे न देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. आता हाच नियम उमेदवारी देताना लावण्यात येण्याची शक्यता आहे.

या सर्वांमध्ये लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी हे दोन ज्येष्ठ नेते अग्रणी आहेत. अडवानी आणि जोशी हे दोघेही सध्या खासदार आहेत. अडवानी यांचं वय 91 वर्षांचं आहे. तर मुरली मनोहर जोशी हे 85 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. वाढत्या वयामुळे अनेक नेत्यांनी अगोदरच माघार घेतली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडूरी आणि बी. एस. कोश्यारी यांनी स्वतःच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि माजी उपसभापती करिया मुंडा हेही निवडणूक लढविण्यास अनिच्छुक आहेत. त्यामुळे लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या बरोबरच शांता कुमार यांनाही निवडणुकीच्या रिंगणापासून बाहेर ठेवण्यात येईल, असे मानले जाते. असे झाले तर भाजपच्या अडवानी युगाचा तो खऱ्या अर्थाने अंत ठरेल.

गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास त्यांनी विरोध केला होता. त्याच वेळेस त्यांना उमेदवारी न दिली जाण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली. परंतु निवडून आल्यानंतर त्यांना कोणतेही पद न देता मार्गदर्शक मंडळात जागा देण्यात आली. तेथे त्यांच्या सोबत जोशी हेही आहेत.

आज अडवानी भाजपमध्ये असले तरी अडवाणींचा भाजपमधील प्रभाव जेमतेमच आहे, हे स्पष्ट झाले आहे. सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या गोटातील नेते मानले जातात. यापैकी स्वराज यांनी निवडणुकीत भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे, तर दोन्ही सिन्हांना अडगळीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे ते मोदींचे कट्टर विरोधक बनले आहेत.

अडवानी हे केवळ भाजपाचेच नव्हे तर भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाशसिंग बादल यांचा अपवाद वगळता त्यांच्या बरोबरीचा कोणताही नेता आज राजकारणात सक्रिय नाहीत. जनसंघाच्या काळापासून ते नेतृत्व करत आहेत. आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबलेल्या मोजक्या हयात नेत्यांपैकी ते एक आहेत. आणीबाणीनंतर आलेल्या जनता पक्ष सरकारमध्ये ते माहिती व प्रसारण मंत्री होते. 1980 मध्ये जनता पक्ष फुटल्यावर भाजपची स्थापना झाली. तेव्हापासून ते या पक्षात आहेत. भाजपला 1984 साली केवळ दोन जागा मिळाल्या होत्या आणि तेथून भाजपला 180 जागांपर्यंत पोचवण्याचे श्रेय अडवानींना जाते. राम मंदिराचे आंदोलन त्यांनी एकहाती चालवले. रथयात्रा आणि वेगवेगळ्या यात्रा काढून भाजपला घरोघर पोचवले. भाजपला भाग्याचे दिवस दाखविण्यामागे निःसंशय त्यांचाच हात होता.

अडवानी हे 1998 ते 2004 या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते 2002 ते 2004 या काळात भारताचे उपपंतप्रधान होते. सचोटी आणि निष्ठा या राजकारणात दुर्मिळ झालेल्या गुणांसाठी ते ओळखले जातात. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूध्द आरोपपत्र दाखल झाल्यामुळे निर्दोष सिद्ध होईपर्यंत मी निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. खरोखरच त्यांनी 1996ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. अडवानी हे आतापर्यंत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून 1998 पासून सहा वेळेस लोकसभेवर निवडून आले आहेत. देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम करताना त्यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

मात्र पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जिनांचे गुणगान करणे त्यांच्या अंगलट आले. तेव्हापासून घसरणीला लागलेली अडवानी यांची राजकीय कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ज्यावेळी अडवानी भाजपला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा नरेंद्र मोदी हे सामान्य कार्यकर्ता व संघाचे प्रचारक होते. मोदींनी अडवानींचे शिष्यत्व पत्करले आणि राजकारणातील एक-एक पायरी वर चढत गेले. आज तेच मोदी पंतप्रधान आहेत आणि अडवानी मावळतीला आले आहेत. कालाय तस्मै नमः, दुसरे काय!

Leave a Comment