या राशीच्या व्यक्तींना ‘सिंगल’ राहणे असते पसंत

relation
रोमँटिक डेट्स, कँडल लाईट डिनर, गाडीतून लांबवर केलेली भटकंती, आणि आयुष्यभराची सोबत अशा कल्पना आणि अपेक्षा अनेक प्रेमीजनांच्या असतात. पण काही व्यक्ती मात्र स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या प्राथमिकता निरनिरळ्या असतात. या प्राथमिकता काय आहेत हे ठरवीत असताना त्या व्यक्तीची रासही प्रभावी ठरत असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. काही राशीच्या व्यक्ती ‘फॉरएव्हर रोमँटिक’ असतात, तर काहींना मात्र सिंगल राहणेच अधिक पसंत असते. धनु राशीच्या व्यक्तींना आयुष्यामध्ये सतत काही तरी नवीन हवे असते. त्यामुळे अशा व्यक्ती सातत्याने नवनवे प्रयोग करून पाहत असतात. त्यामुळे एकाच व्यक्तीबरोबर कायम स्वरूपी कमिटमेंट त्यांना नकोशी वाटण्याचा संभव असतो. कायमस्वरूपी रिलेशनशिप मध्ये राहिल्याने त्यांच्या स्वच्छंदीपणावर बंधन येईल अशी या व्यक्तींची भावना असून, त्यामुळे या व्यक्ती सिंगल राहणे अधिक पसंत करतात.
relation1
कुंभ राशीच्या व्यक्तींना इतरांशी मैत्री करणे, क्वचित एखाद्या ‘डेट’ साठी भेटणे सहज जमत असले, तरी एखाद्या व्यक्तीच्या मनापासून प्रेमात पडल्याखेरीज या व्यक्ती ‘कमिटमेंट’ करीत नाहीत. मुळातच कुंभ राशीच्या व्यक्ती अतिशय स्वावलंबी असल्याने भावनिक पातळीवरही इतर कोणावर अवलंबून राहणे त्यांना आवडत नाही. आपली कामे आपल्या पद्धतीने करणे त्यांना जास्त आवडते. रिलेशनशिप मध्ये असताना देखील या व्यक्ती भावनांच्या पेक्षा व्यवहारीपणाला प्राधान्य देतात. त्यामुळे भावनिक पातळीवर गुंतागुंतीच्या रिलेशनशिप मध्ये राहण्यापेक्षा या व्यक्ती सिंगल राहणे अधिक पसंत करतात. जेव्हा त्यांच्या विचारांशी सहमत असणारा जोडीदार त्यांना मिळेल तेव्हाच या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात.
relation2
सिंह राशीच्या व्यक्ती अतिशय दिलदार आणि मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. पण काही वेळा या व्यक्ती काहीशा स्वार्थी, केवळ स्वतःचा फायदा कशात आहे याचा विचार करताना दिसतात. या राशीच्या व्यक्तींना प्रसिद्धीची आवड असते. त्याचबरोबर आपल्याला मिळत असलेले यश, किंवा प्रसिद्धीचा वाटा इतर कोणाला देण्यास या व्यक्ती सहसा तयार नसतात. किंबहुना रिलेशनशिप मध्ये असल्यास आपल्या जोडीदाराला देखील आपल्या यशाचे, प्रसिद्धीचे भागीदार करण्यास काही वेळा ही मंडळी तयार नसतात. अशा व्यक्ती इतरांशी मैत्री पटकन करीत असल्या, किंवा इतरांच्या सहवासामध्ये राहणे त्यांना आवडत असले, तरी सरतेशेवटी स्वतःचीच साथ या व्यक्तींना अधिक प्रिय असते. त्यामुळे अशा व्यक्ती सहसा सिंगल राहणे पसंत करतात.
relation3
मिथुन राशीच्या व्यक्ती भविष्याचा विचारसा गांभीर्याने करीत नाहीत. त्याचबरोबर भावनिक पातळीवर गुंतागुंतीचे नातेसंबंध ही त्यांना विशेष आवडत नाहीत. त्यामुळे एखाद्या कायमस्वरूपी कमिटमेंटच्या ऐवजी कॅज्युअल रिलेशनशिपला या व्यक्ती अधिक प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींनाही नाविन्याची आवड असते. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टींच्या वाटेला अजिबात जायचे नाही, याचे निश्चित ठोकताळे त्यांच्या मनामध्ये असतात. त्यांना आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणे आवडते. या व्यक्तींना त्यांची ‘पर्सनल स्पेस’ ही अतिशय महत्वाची असून त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये इतरांनी ढवळाढवळ केलेली त्यांना आवडत नाही. म्हणूनच या व्यक्ती सिंगल राहणे अधिक पसंत करतात.

Leave a Comment