या अॅपवर मिळेल तुमच्या खासदार-आमदाराचे प्रगती पुस्तक

app
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकींची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. यावेळी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. 11 एप्रिलपासून निवडणुकांची सुरवात होणार आहे. मतदारांची निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते. कारण, आपल्याच मतांवरुन देशाचे नेतृत्व ठरत असल्यामुळे मत देण्यापूर्वी उमेदवाराबाबत, आमदार-खासदारांबाबत, सध्याच्या मंत्रीमंडळाबाबत जाणून घेणेही महत्वाचे असते.

तुम्हाला राजकीय नेत्यांबाबत जाणून घेण्यासाठी ‘नेता’ (Neta) या अॅप्लिकेशनची मदत होऊ शकते. तुम्ही तुमच्या आमदार, खासदारांच्या कामाचा रिपोर्ट या अॅप्लिकेशनच्या मदतीने जाणून घेऊ शकता आणि त्यांना रेटही करु शकता. तुम्ही प्ले स्टोअरवरुन या अॅप्लिकेशनला मोफत डाउनलोड करु शकता.

2018 मध्ये हे अॅप्लिकेशन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लाँच केले होते. तुम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांसोबतच सर्व पक्षांच्या नेत्यांचे या ‘नेता’ अॅप्लिकेशनमध्ये रेटिंग करु शकता. तसेच कमेंटही करु शकता. आयटी तज्ञ प्रथम मित्तल यांनी या अॅप्लिकेशनला डिझाईन केलं आहे. https://neta.co.in/ वेबपोर्टलमध्येही हे अॅप्लिकेशन उपलब्ध आहे.

तुम्हाला ‘नेता’ या अॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी प्ले स्टोअरवरुन ते डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन सिलेक्ट करावे लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या लोकेशनपासून दूर असल्यावरही तुमच्या भागातील नेतेमंडळींना रेट करु शकता. तुम्ही घरापासून जर दूर असाल, तर तुमचा पिनकोड किंवा मतदारसंघाचे नाव टाकून तुमच्या नेत्यांची माहिती मिळवू शकता.

डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांत तुम्ही कुणाला मत देणार? असा प्रश्न विचारला जाईल. याचे उत्तर द्यायचे की नाही हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर या प्रश्नाच उत्तर द्यायचे नसेल तर तुम्ही ते ऑप्शन सोडून पुढील ऑप्शनवर जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही नेत्यांना रेट करु शकता. आतापर्यंत पाच लाख लोकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले आहे. या अॅप्लिकेशनवर जो नागरिक अधिक अॅक्टिव्ह असेल त्याला ‘स्टार सिटीझन’ म्हणून हायलाईट करण्यात येईल.

Leave a Comment