हे आहे जपानमधील झपाटलेले बेट

japan
जगामध्ये अनेक घरे किंवा इमारती ‘झपाटलेल्या’ असल्याच्या कितीतरी कथा प्रसिद्ध आहेत. मात्र जपानमध्ये एक संपूर्ण बेटच झपाटलेले असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अर्थाताच या बेटावर मानवी वस्ती अशी नाहीच. जपानमधील हाशिमा बेट एकेकाळी बऱ्यापैकी समृद्ध बेटांपैकी एक होते. कोळश्याच्या खाणींमध्ये काम करीत असणारे लोक त्यांच्या परिवारासमवेत येथे रहात असत. मात्र कालांतराने या बेटावरील वस्ती कमी होत गेली आणि त्यानंतर हे बेट पूर्णपणे ओसाड, निमनुष्य होऊन गेले. आतातर हे बेट झपाटलेले असल्याच्या कथा सर्वश्रुत झाल्यानंतर या बेटाकडे फारसे कोणी फिरकत नाही. एके काळी अनेक कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या इमारती आज या बेटावर एकाकी उभ्या आहेत.
japan1
हाशिमा बेटाला ‘गुंकानजिमा’ या नावाने ही ओळखले जाते. लढाऊ जहाज असा या नावाचा अर्थ आहे. विमानातून पाहिल्यास हे बेट एखाद्या ‘बॅटलशिप’ प्रमाणे दिसत असून, त्यामुळे त्याला हे नाव पडले असल्याचे म्हटले जाते. नागासाकी प्रांतामधील एकूण पाचशे पाच निर्मनुष्य लहान मोठ्या बेटांमधील हे एक बेट असून नागासाकी शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हाशिमा बेट आहे. १८८७ सालापासून १९७४ सालापर्यंत या बेटावर मानवी वसाहत होती. त्याकाळी मित्सुबिशी कंपनीच्या मालकीचे हे बेट असून पाण्याच्या खाली असलेल्या खाणींमधून कोळसा काढण्याचे काम येथे होत असे. १९१६ साली या बेटावर पहिली कॉन्क्रीटची पक्की इमारत बांधण्यात आली असून, या इमारतीमध्ये खाण कामगारांना राहण्यासाठी घरे देण्यात आली होती. १९५८ सालापर्यंत या बेटावरील जनसंख्या ५,२५९ पर्यंत जाऊन पोहोचली होती. १९६० साली कोळशाचा वापर संपुष्टात येऊन जेव्हा पेट्रोलियमचा वापर सुरु झाला, तेव्हा येथील खाणींचे काम बंद पडले.
japan2
या बेटावर असलेल्या आवासी इमारतींच्या व्यक्तिरिक्त एक हॉस्पिटल, दोन शाळा, एक मंदिर, काही दुकाने, रेस्टॉरंट्स आणि इतर काही इमारती आता उजाड झाल्या आहेत. २००९ सालापासून हे बेट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले, तरी या बेटावर टुरिस्ट गाईडला सोबत घेतल्याखेरीज जाण्याची अनुमती नाही. तसेच एका तासापेक्षा जास्त वेळ या बेटावर घालविण्याची मुभाही पर्यटकांना नाही. या बेटावर आलेल्या अनेक पर्यटकांनी येथील उजाड इमारतींमधून अनेक चित्रविचित्र आवाज ऐकले असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच कदाचित हे बेट झपाटलेले असल्याच्या अनेक कथा अस्तित्वात आल्या असाव्यात. ‘स्कायफॉल’ या बॉंड-पटाच्या काही भागाचे चित्रीकरण या बेटावर करण्यात आले होते.

Leave a Comment