या देशांमध्ये दाढीपासून सावली पर्यंत अजब गोष्टींवर कर !

beard
प्रत्येक देशाचे सरकार, खर्च चालविण्यासाठी जनतेकडून कर वसूल करीत असते. मात्र काही देशांमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अगदी अजब गोष्टींवरही सरकारने कर लावून जनतेकडून पैसे वसूल केले आहेत. मग हा कर सतराव्या शतकामध्ये इंग्लंड सरकारने खिडक्यांवर लावलेला कर असो, किंवा रशिया देशामध्ये पुरुषांच्या दाढीवर लावण्यात आलेला कर असो, आजवरच्या इतिहासामध्ये चित्रविचित्र गोष्टींसाठी काही देशांच्या सरकाराने कर लावले आणि वसूलही केले आहेत. अशाच काही ‘कल्पक’ करांविषयी जाणून घेऊ या.
beard1
ख्रिस्तपूर्व काळामध्ये इजिप्तच्या राजांनी स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलावर कर लावले होते. तसेच हा कर चुकविण्यासाठी लोक एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरत तर नाहीत याची कसून तपासणीही होत असे. त्या काळी हा कर जनतेकडून स्थावर मालमत्ता किंवा शेतीतील उत्पन्नाच्या रूपात वसूल केला जात असे. प्राचीन काळामध्ये, नवव्या शतकामध्ये रोमन सम्राट ऑगस्टसने लग्नाविना राहणाऱ्या, म्हणजेच आजकालच्या भाषेमध्ये सांगायचे झाले, तर ‘सिंगल’ लोकांकडून कर वसूल केला जाण्याचा हुकुम जारी केला होता. त्या काळी देशातील जनसंख्या सातत्याने वाढावी या विचारांचे हे सम्राट असल्याने जे लोक सिंगल असत, किंवा ज्यांना मुले होत नसत, त्यांच्याकडून कर वसूल केला जात असे. किंबहुना सतराव्या शतकामध्ये मुले नसलेल्या विधवांच्या कडून कर वसूल केला जाण्याची प्रथा ब्रिटनमध्ये देखील होती. आजच्या काळामध्ये देखील अमेरिकेतील मिसूरी राज्यामध्ये एकवीस ते पन्नास वर्षे वयापर्यंतच्या ‘सिंगल’ पुरुषांना एक डॉलरचा कर भरावा लागतो.
beard2
बाराव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान ब्रिटनचे राजे हेन्री (पहिले) यांनी ज्या सरदारांना युद्धामध्ये सहभागी व्हायचे नसेल, त्यांना तशी मुभा दिली खरी, पण त्याचबरोबर अशा ‘पळपुट्या’ सरदारांकडून ‘कावर्ड टॅक्स’ म्हणजेच पळपुटेपणा दाखविल्याबद्दल कर वसूल केला जाऊ लागला. अशाच प्रकारचे कर फ्रांस आणि जर्मनीमध्ये ही वसूल केले जात असत, पण ती प्रथा चौदाच्या शतकामध्ये संपुष्टात आली. १५३५ ते १७७२ या काळामध्ये पुरुषांच्या दाढीवर कर लावण्याची कल्पना वास्तविक ब्रिटीशांची होती. राज हेन्री (आठवे) आणि त्यापुढे राणी एलिझाबेथ (पहिली) यांनी पुरुषांच्या दाढी-मिशांवर कर लावले होते. मात्र रशियाचे राजे पीटर द ग्रेट यांनी त्याही पुढे जाऊन १६९८ साली दाढी ठेवण्यास इच्छुक पुरुषांना एक नाणे विकत घेण्याचा हुकुम जारी केला. या नाण्यावर ‘दाढी हा शरीरावरील अनावश्यक भार आहे’ असे लिहिलेले होते ! हा कर १७७२ साली संपुष्टात आला.
beard3
१६९६ साली ब्रिटनमध्ये खिडक्यांवर कर लावण्यात आला. ब्रिटनच्या इतिहासामध्ये लागू केल्या गेलेल्या सर्वात निरर्थक करांमध्ये या कराची गणना केली जाते. या कराच्या नियमाअंतर्गत ज्या घराला दहा पेक्षा अधिक खिडक्या असतील, त्या घरामध्ये राहणाऱ्या परिवाराला अतिरिक्त खिडक्यांसाठी कर भरावा लागत असे. त्यावेळी अनेक परिवारांनी आपल्या घरामध्ये केवळ दहा खिडक्या ठेऊन त्यापेक्षा अतिरिक्त खिडक्या कायमस्वरूपी बंद करवून घेतल्या होत्या. इतकेच नव्हे, तर आजकालच्या काळामध्ये स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेल्या साबणावरही एके काळी ब्रिटनमध्ये कर लावला जात असे. त्याकाळी साबण वापरणे ही चैनीची वस्तू समजली जात असल्याने त्यावर कर लावला गेला असून, साबण खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नव्हते. अखेरीस १८३५ साली हा कर काढून टाकण्यात आल्याने साबण घराघरात पोहोचला.
beard4
इटलीतील कोनेग्लीयानो या गावामध्ये, १९९३ सालापासून ज्या दुकानदारांच्या दुकानाच्या फलकाची सावली रस्त्यांवर पडते, त्यांच्याकडून त्या बद्दल कर वसूल केला जात आहे. तसेच दुकानाच्या बाहेर उन्हा-पावसापासून बचाव करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या छताबद्दलही (awning) दुकानदारांकडून वर्षाला शंभर युरोजचा कर वसूल केला जातो.

Leave a Comment