
अवघ्या काही दिवसांवर यंदाची लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाने या सतराव्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणूक यावेळी सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. मतदानाची सुरूवात ११ एप्रिल रोजी होणार असून शेवटचा टप्पा ११ मे रोजी पार पडणार आहे. तसेच मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.
बाहेरगावी असतानाही तुम्ही बजावू शकता तेथील मतदारसंघात मतदानाचा हक्क
जवळपास ९० कोटी मतदार यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार असून त्यातील १.५० कोटी मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत. त्यातील काही मतदार हे कामधंदा किंवा शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात स्थायिक झाले असल्यामुळे त्यांना अनेकदा मतदान करणे शक्य होत नाही. पण तुम्ही आता बाहेरगावी असताना तेथील मतदारसंघात मतदान करु शकता. तुम्हाला यासाठी तुमचे नवे मतदानपत्र तयार करुन घेणे गरजेचे आहे.
नव्या ठिकाणी मतदानपत्र मिळवण्यासाठी www.nvsp.in वर क्लिक करा. जर तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार असाल किंवा मतदान क्षेत्र बदलणार असाल तर Form 6 वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सोयीस्कर भाषा निवडा. त्यानंतर तुमच्या राज्य किंवा जवळच्या विधानसभा क्षेत्राची माहिती द्या. मतदान क्षेत्र बदण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा. त्याचबरोबर तुमचा राहता पत्ता आणि कायमचा पत्ता लिहा. तसेच ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरही लिहावा. तुमचा फोटो, वय आणि वास्तव्याचा दाखला अपलोड करा. डिक्लेअरेशन फॉर्ममध्ये तुमच्या जन्माचा पुरावा द्या. त्यानंतर कोपऱ्यामध्ये दिलेला नंबर पुन्हा टाकून सबमीट या पर्यायावर क्लिक करा.
