विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानामध्ये सापडल्या अशा ही वस्तू !

airport
विमान प्रवास करीत असताना सामानाची कसून तपासणी कशासाठी केली जाते याची आपल्याला माहिती आहेच. गेल्या काही वर्षांमध्ये, इतर प्रवाश्यांच्या आयुष्याला धोका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या वस्तू, किंवा इतर बेकायदेशीर वस्तू विमानापर्यंत जाऊन पोहोचू नयेत यासाठी यासाठी सुरक्षा तपासणी जास्त कडक केली गेली आहे. तरीसुद्धा आपल्या सामानामधून सोने, हिरे, अंमली पदार्थ, प्राचीन, दुर्मिळ मूर्ती असल्या वस्तू नेण्याच्या प्रयत्नांत पकडल्या गेलेल्या प्रवाशांचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. या वस्तूंच्या व्यतिरिक्त देखील अनेक चित्रविचित्र वस्तू प्रवासी आपल्या सामानातून नेत असताना पकडले गेले आहेत. सामान्यपणे प्रत्येक मोठ्या विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी सर्वसाधारणपणे चोवीस तासांच्या अवधीमध्ये काही हजार प्रवाश्यांची तपासणी दररोज करीत असतात. विमान प्रवास जसजसा अधिक लोकप्रिय होत आहे, तसतशी ही संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू बेकायदेशीरपणे सामानातून नेण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ होणार असल्याची वाढती चिंता या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
airport1
विमानाने प्रवास करीत असताना सामानामध्ये काय नेले जावे आणि काय नेले जाऊ नये यासंबंधी ठराविक नियमावली असते. या नियमावलीची माहिती विमानाने पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्यांना नसली, तरी काही प्रवाश्यांना पूर्ण माहिती असूनही नेऊ नयेत अशा वस्तू सामानामध्ये नेल्याने गजाआड गेलेल्या महाभागांचे किस्से प्रसारमाध्यमांच्या मार्फेत आपल्या कानी पडत असतात. २०१० साली बँकॉक विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका थाय महिलेच्या सामानातून वाघाचा बछडा जप्त केला होता. सुरक्षा अधिकाऱ्यांना समजू नये यासाठी या बछड्याला बेशुद्ध करून अनेक सॉफ्ट टॉईजच्या जोडीने या महिलेने आपल्या बॅगमध्ये ठेवले होते. मात्र सामानाच्या एक्स रे स्कॅनमध्ये महिलेच्या बॅगमध्ये वाघाचा जिवंत बछडा असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बछड्याची रवानगी वन विभागाकडे आणि महिलेची रवानगी अर्थातच गजाआड झाली.
airport2
२०१६ साली एका इज्रायली प्रवाश्याने आपल्या सामानातून सहा जिवंत कबुतरे नेण्याचा प्रयत्न केला. ही कबुतरे अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या उझबेकी प्रजातीची असून एका कबुतराची किंमत शंभर डॉलर्सहूनही अधिक होती. ही कबुतरे जवळ बाळगण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे या प्रवासीकडे नसल्याने त्याला जबर दंड भरवा लागला होता, आणि त्यानंतर कबुतरांची रवानगी वन विभागाकडे करण्यात आली होती. एका प्रवासीने एका मोठ्या लाकडी सुटकेसमधून चक्क २४० जिवंत मासे विमानातून नेण्याचा प्रयत्न केला असून ही घटना २०१३ साली लॉस एंजेलेस विमानतळावर घडली. सामानातून जिवंत मासे अनधिकृतपणे नेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या प्रवाशाला एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षा सुनाविण्यात आल्या होत्या.
airport3
२००७ साली दक्षिण कोरियामधून अटलांटा येथे निघालेल्या एका प्रवासीच्या सामानामध्ये तब्बल तीस विषारी, अतिशय दुर्मिळ प्रजातीचे साप असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. खरेतर जिवंत साप विमानाच्या कार्गोमधून नेण्याची परवानगी, काही औपचारिकता पूर्ण केल्यावर देण्यात येत असली, तरी या सापांना जिवंत ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले रसायन मात्र बेकायदेशीर असल्याने या प्रवासीला साप नेण्यास परवानगी देण्यापूर्वी त्याच्याकडून जबर दंड वसूल करण्यात आला होता.

Leave a Comment