गोंधळलेल्या मनसेची माघार कार्यकर्त्यांच्या फायद्याचीच!

raj-thakre
अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला इरादा पक्का केला म्हणायचे! मनसे येत्या लोकसभा निवडणुकीत भाग घेणार नाही, हे पक्षाने ठरविल्याचे सांगितले जात आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे येत्या 19 मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा करतील, असे सांगितले जाते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेले संभ्रमाचे वातावरण दूर होण्यास मदत होईल. गेल्या 13 वर्षांत एका अपेक्षाभंगाकडून दुसऱ्या अपेक्षाभंगाकडे प्रवास केलेल्या मनसेच्या इंजिनाचा हा एक नवीन स्टॉप म्हणावा लागेल.

मनसेची स्थापना 2006 मध्ये झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी केलेले भाषण आजही लोकांच्या स्मरणात आहे. ” मला महाराष्ट्रात जीन्स घालून ट्रॅक्टरवर जाणारा शेतकरी पाहायचा आहे,” हे त्यांचे वाक्य त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वैयक्तिक करिष्मा अद्याप कायम आहे, याबाबत काहीही शंका नाही. खासकरून माध्यमांमध्ये राज ठाकरे आजही आपले स्थान टिकवून आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष असले तरी सत्ताधारी भाजपवर खऱ्या अर्थाने टीका करण्यात राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रत्येक विधानाला माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळते. मात्र राजकीय कार्याच्या बाबतीत बोलायचे तर मनसेच्या खात्यावर फार काही दिसत नाही.

एकतर पक्षाकडे भरीव असा राजकीय कार्यक्रम नाही. “महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा” अशी हाक देऊन मनसेने पहिल्यांदा लोकांकडे मते मागितली होती. मराठीच्या हितरक्षणासाठी आपला पक्ष कटिबद्ध असल्याचे राज यांनी वारंवार सांगितले होते. त्यामुळे लोकांच्या मनसेकडून खूप अपेक्षा वाढल्या होत्या. त्यातही हा पक्ष तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता.

पक्षाने 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही मात्र शिवसेनेची मते फोडण्यामध्ये पक्ष यशस्वी झाला. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेशी युती करणाऱ्या भाजपच्या जागा घटल्या. पण हेच आपले यश असल्याचे ठसवण्यात राज ठाकरे यशस्वी झाले. मनसेची उपद्रवक्षमता त्यावेळी सिद्ध झाली. म्हणूनच शिवसेना आणि भाजप मनसेबाबत सावधगिरी बाळगू लागले. त्या लोकसभेनंतर पाठोपाठ आलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला घवघवीत यश मिळाले.

त्याच्या मागोमाग झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही मनसेने आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवला. मात्र पक्षाचा काही कार्यक्रमच नसल्यामुळे या यशाचे काय करायचे, हेच मनसैनिकांना कळत नव्हते. पक्षात शैथिल्य आले. राज ठाकरे यांच्यानंतर पक्ष नेतृत्वाची दुसरी फळी कधीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे पक्षकार्याच्या नावाने सगळा आनंदीआनंद होता. सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये तोडफोड करणे हाच पक्षाचा अजेंडा बनला. मनसेस्टाईल आंदोलन हा शब्दप्रयोग अपमानास्पद मानण्याऐवजी अभिमानाने वापरला जाऊ लागला. दुय्यम नेत्यांच्या अशा वागण्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले.

हे सर्व चालू असताना पक्षप्रमुख राज ठाकरे सक्रीय होऊन पक्षाला दिशा देताना दिसत नव्हते. आपल्या नेत्याचे विचार नक्की काय आहेत, हे ना त्यांच्या हाताखालच्या नेत्यांना माहित होते ना कार्यकर्त्यांना. त्यात टोलविरोधी आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर मनसेवरचा लोकांचा विश्वास उडाला. त्यांच्याकडे अपेक्षेने बघणाऱ्या लोकांच्या हाती नुसतीच आश्वासने आणि भाषणे याशिवाय काहीही आले नाही. नाशिक महापालिकेतील सत्तेचा उपयोग पक्षाला करता आला नाही आणि इतरत्र विरोधी पक्ष म्हणूनही मनसे अपयशी ठरला. स्वतः राज यांच्याच धरसोड वृत्तीमुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अविश्‍वासाची भावना निर्माण झाली.

गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार देणार नाही मात्र नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊ, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शेवटच्या आजारपणात दिलेल्या सूपचा उल्लेख करून त्यांनी उरलीसुरली सहानुभूती गमावली. त्यामुळे जेवढ्या झटपट मनसेने यश कमावले तितक्यात वेगाने त्याला पराभव पत्करावा लागला. याचाच परिणाम म्हणून यंदाची निवडणूक लढवावी का नाही, या संभ्रमात मनसे म्हणजे राज ठाकरे होते.

आज स्थिती अशी आहे, की राज यांच्या भोवती दुर्दैवाने फक्त खूशमस्कर्‍यांची फौज उभी आहे. ज्यांना लोकांमध्ये स्थान आहे असे अनेक जवळचे सहकारी मनसे सोडून गेले आहेत. याचाच अर्थ त्यांना मनसेमध्ये आपले भवितव्य दिसत नाही. थोडक्यात निवडणूक लढवली तर पुरता फज्जा आणि न लढवली तर पराभवाला घाबरले हा कलंक, अशा कात्रीत मनसे सापडला होता. अन्य सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी गेले वर्षभर तयारी सुरू केली असताना मनसेचे मात्र तळ्यात मळ्यात चालू होते. राज ठाकरे कधी स्वबळावर निवडणूक घडवण्याची गोष्ट करत असेल तर कधी मनसेला भाजपविरोधी आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात होते. आता एकदा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, हे नक्की झाले ते बरे झाले. निदान कार्यकर्त्यांना आपला भविष्याचा रस्ता निवडणे सोपे होईल!

Leave a Comment