सूर्यपूजा करताना जल अर्पण अशा पद्धतीने करावे

pooja
सनातन धर्मामध्ये सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वैदिक काळापासून चालत आलेल्या या परंपरेचे पालन आजच्या काळामध्येही अनेक कुटुंबांमध्ये नियमित केले जाते. भगवान रामचंद्र देखील नित्यनेमाने सूर्यपूजा करीत असल्याचा उल्लेख आहे. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाला दररोज प्रातःकाली जल अर्पण केल्याने त्या निमित्ताने सूर्याचे दर्शन घेणे पुण्यफलदायी मानले गेले आहे. शास्त्रांच्या अनुसार सूर्याला जल अर्पण करण्याचे देखील विशिष्ट नियम असून सूर्यपूजा करताना या नियमांचे पालन केले जाणे आवश्यक मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव कमी असेल, त्यांनी दररोज सूर्यपूजा करणे श्रेयस्कर मानले गेले आहे. सूर्यपूजेमध्ये सूर्याला जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
pooja1
शास्त्रांच्या अनुसार सूर्याला आत्म्याचा कारक मानले गेले असून, सूर्याला नियमित जल अर्पण केल्याने आत्मशुद्धी होते आणि आत्मबलाची प्राप्ती होते. प्रातःकाली सूर्याला जल अर्पण करताना शरीराला ‘ड’ जीवनसत्व मिळत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने देखील ही परंपरा महत्वाची मानली गेली आहे. सूर्याला जल अर्पण केल्याने शरीरामध्ये सकारात्मक उर्जेचे आणि चैतन्याचे संचरण होते. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार ज्यांच्या कार्यांमध्ये सतत काही ना काही बाधा येत असतील त्यांनी सूर्याला नियमित जल अर्पण केल्याने या बाधा दूर होत असल्याचे म्हटले जाते.
pooja2
सूर्यपूजेच्या पूर्वी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करण्यासाठी तांब्याचे पात्र वापरले जावे. सूर्योदय झाल्यानंतर एका तासाच्या अवधीमध्ये पूजा करून सूर्याला जल अर्पण केले जावे. सूर्याला अर्पण करण्याच्या जलामध्ये किंचित रक्तचंदन किंवा लाल रंगाचे पुष्प घालून घेऊन मगच हे जल सूर्याला अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करताना आपले मुख पूर्वेला सूर्याकडे असावे. जरी मध्ये इमारती किंवा झाडे असल्यामुळे सूर्य दृष्टीस पडत नसला तरी पूर्वाभिमुख राहूनच सूर्याला जल अर्पण करावे. सूर्यपूजा करताना शक्यतो लाल रंगाची वस्त्रे परिधान करावीत. हे शुभफलदायी मानले गेले आहे. अर्घ्य देताना हात डोक्याच्या समांतर किंवा डोक्याच्या वर असावेत. सूर्याला जल अर्पण केल्याने नवग्रहांची कृपादृष्टी राहत असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर सूर्यपूजा बल, विद्या, बुद्धी, आणि दिव्यत्व प्राप्त करून देणारी असल्याचे म्हटले जात असल्याने या पूजेला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्व आहे.

Leave a Comment