राजकारण्यांच्या गर्दीत उठून दिसणारा राजस नेता

manohar-parrikar
ही गोष्ट 1970च्या दशकातील. पवईतील आयआयटीत शिकणारा एख विद्यार्थी दररोज लोकल गाडीने प्रवास करत असे. कधी कधी पहाटे उठवून सुद्धा तिकिट खिडकीवरील माणूस जागाच होत नसे. त्यामुळे त्या तरुणाला विनातिकिट प्रवास करावा लागे. एके दिवशी दादरला तिकिट तपासनीसाने त्या तरुणाला पकडलेच आणि त्याला दंडही ठोठावला. दंड तर त्याने भरला परंतु आपल्याला विनाकारण भुर्दंड भरल्याची भावना त्याच्या मनात राहिली. त्याचा राग म्हणून तो विद्यार्थी अनेक दिवस विनातिकिट प्रवास करत होता. मात्र त्याचे अंतर्मन काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे आपल्या या फुकट प्रवासामुळे सरकारला किती नुकसान झाले, याचा त्याने एके दिवशी हिशेब केला. त्यानंतर टपाल कार्यालयात जाऊन तेवढ्या रकमेची पोस्ट तिकिटे विकत घेतली आणि तिथल्या तिथे ती फाडून टाकली. ‘आता माझा आणि भारत सरकारचा हिशेब पूर्ण झाला,” असा सुटकेचा निःश्वास त्याने टाकला. तो तरुण म्हणजेच पुढे जाऊन गोव्याचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषविणारे मनोहर पर्रिकर.
manohar-parrikar1
रविवार, 17 मार्च रोजी, पर्रिकर यांनी शेवटचा श्वास घेतला आणि एका निष्ठावान, कर्तव्यदक्ष आणि सचोटीच्या राजकारण्याचा अंत झाला. राजकारणी असेही असू शकतात यावर विश्वास बसणार नाही इतक्या प्रामाणिकतेने पर्रिकर यांनी आपली कारकीर्द घडवली. शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत मी देशाची सेवा करेन, असे अनेक जण बोलतात. मात्र हे वाक्य पर्रिकर यांनी अक्षरशः खरे केले. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लोकांचा प्रचंड विश्वास आणि अफाट प्रेम तर कमावलेच, पण स्वतंत्र भारताचे 26वे संरक्षणमंत्री म्हणूनही अल्पावधीतच त्यांनी छाप पाडली. “बंदूक घेऊन आलेल्या दहशतवाद्यांच्या मानवाधिकारांवर कोणीही भाषणा द्यायची गरज नाही,” “दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दहशतवाद्यांचाच उपयोग करावा लागेल, काट्याने काटा काढावा लागेल,” अशी त्यांची वक्तव्ये गाजली. मात्र ही वक्तव्ये केवळ हवेतील घोषणाबाजी न ठरता ती त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवली. पाकिस्तानव्याप्त काश्मिरमध्ये झालेला पहिला सर्जिकल स्ट्राईक त्यांच्याच काळातला.
manohar-parrikar2
“देशाने संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची गरज असून देशाच्या संरक्षण क्षमतेत जास्तीत जास्त वाढ करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देशाला जर काही संकटांचा सामना करावा लागला तर त्यासाठी शस्त्रास्त्र आणि युध्दसामग्रीसाठी इतर देशांवर अवलंबून रहाणे योग्य नाही, त्यामुळे देशी बनावटीच्या युध्दसामग्रींची निर्मिती होणे आवश्यकआहे,” असे त्यांचे मत होते. तसेच अन्नसुरक्षा, ऊर्जा सुरक्षा किंवा सीमा सुरक्षेचा विचार करतो तेव्हा याबाबतीत स्वयंपूर्णता असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणत. तसेच युध्दासाठीच्या शस्त्रसामग्रीसाठी आपल्याला अन्य देशांवरच अवलंबून रहावे लागते, याबाबत त्यांना चिंता वाटत होती. त्यातूनच संरक्षण उत्पादनांची निर्मिती देशातच व्हावी, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्या दृष्टीने त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.
manohar-parrikar3
माणूस म्हणून पर्रिकर हे साधेपणाचे मूर्तिमंत उदाहऱण होते. कोणीही थक्क व्हावे असे लौकिक यश मिळाले तरी त्यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर राहिले. आज प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे आहे पण यशस्वी होण्यासाठी आधी अपयशाला स्वीकारायला शिकले पाहीजे तरच मिळालेले यश चिरंतर टिकते, असे त्यांनी एकदा म्हटले होते. ते वाक्य त्यांनी जीवंत करून दाखवले. माणसातील साधेपणा हा प्रचार करण्याची बाब नाही, तर तो त्या व्यक्तीच्या स्वभावाचा भाग असला पाहिजे. आज यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण कठोर मेहनत आणि जिद्द हे यशाचे प्रमुख अंग आहेत. संयमाने ताकद वाढते आणि विनयाने धार चढते. ती धार त्यांच्या व्यवहारातून, बोलण्या-चालण्यातून जाणवत होते. म्हणूनच कर्करोगासारख्या दुर्धर रोगाशी सामना करतानाही नाकात नळ्या घालून विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्याची हिंमत ते दाखवू शकले.

मनोहर पर्रिकर यांच्या सारखे नैष्ठिक आचरण असणारे नेते अत्यंत दुर्मिळ होते. वावदूक विधाने आणि भ्रष्टाचार यांमुळे बदनाम झालेल्या राजकारण्यांच्या गर्दीत हे राजस आणि लोभस व्यक्तिमत्त्व उठून दिसायचे. जीवात जीव असेपर्यंत कर्तव्यपूर्ती करत देशसेवा आणि लोकसेवा करणाऱ्या या झुंजार नेत्याला सलाम!

Leave a Comment