काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडू नका – मायावती

mayawati
लखनौ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने उत्तर प्रदेशातील आघाडीसाठी सपा-बसपाला ७ जागा सोडल्याच्या वृत्तानंतर बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती या चांगल्याच भडकल्या आहेत. काँग्रेससोबत उत्तर प्रदेशात आमची कुठलीही आघाडी झालेली नसल्याचे मी पुन्हा एकदा मी स्पष्ट करत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.


मायावती म्हणाल्या, बसपाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे की, काँग्रेसला उत्तर प्रदेशसहित संपूर्ण देशभरात आमचे कोणतेही समर्थन नाही किंवा त्यांच्याशी कोणतीही आघाडी झालेली नाही. काँग्रेस पक्षाकडून पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही अफवांना आमच्या लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.


त्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाल्या, उत्तर प्रदेशातही काँग्रेस पक्ष पूर्णपणे स्वतंत्र आहे. येथे त्यांनी सर्व ८० जागांवर उमेदवार उभे करुन एकट्याने निवडणूक लढवावी. भाजपला पराभूत करण्यासाठी आमची आघाडी (सपा-बसपा) एकटी पूर्णपणे सक्षम असल्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसने जबरदस्तीने सपा-बसपा-रालोदला ७ जागा सोडल्याची अफवा पसरवू नये.

Leave a Comment