भाजपच्या पडद्यावर बिहारी बाबू ‘खामोश’!

shatrughna-sinha
निवडणुका म्हटले की दर वेळेस तारे-तारका आणि क्रीडापटूंची गर्दी होते. प्रत्येक पक्षात अशा सेलिब्रिटींची गर्दी असते. मात्र यंदा एक सिनेतारा निवडणुकीच्या रणधुमाळीत पूर्वीसारखा चमकणार नाही. भरदार आवाज आणि अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध असलेले बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या पडद्यावर नसतील, हे जवळजवळ नक्की आहे. गेली पाच वर्षे आपल्याच पक्षावर दुगाण्या झाडणाऱ्या सिन्हा यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही, हे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उघडपणे बोलले जात आहे.

शत्रुघ्न सिन्हा हे गेली जवळपास तीन दशके भारतीय जनता पक्षात सक्रीय आहेत. मात्र गेली पाच वर्षे त्यांनी पक्ष नेतृत्वावर सातत्याने टीका केली आहे. भाजपमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना झाल्यामुळे त्यांनी उघडपणे बंडखोरीचे निशाण फडकवले. मात्र पक्षाने त्यांना काढूनही टाकले नाही किंवा त्यांच्याकडे लक्षही दिले नाही. आता स्वतःच भाजप सोडण्याचे संकेत सिन्हांनी दिले आहेत. ‘‘जनतेला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण व्हायची आहेत…प्रेम करणारे कमी होणार नाहीत, मात्र तुमच्या मैफिलीत मी नसेन,’’ असे ट्वीट त्यांनी केले. हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुलक्षून होते.

त्यांनी 1969 साली ‘साजन’ या चित्रपटातून बॉलीवुडमधील कारकीर्दीला सुरूवात केली. खलनायक आणि नायक अशा दोन्ही पद्धतीच्या भूमिका त्यांनी लिलया निभावल्या. ‘खामोश….’ हा त्यांचा संवाद आजही प्रसिद्ध आहे.

आपण 1974 मध्ये पहिल्यांद लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन सार्वजनिक जीवनात प्रवेश करून लोककल्याणाची कामे करण्यास आपण प्रवृत्त झालो, असा सिन्हा यांचा दावा आहे. त्यांनी 1980 च्या दशकात स्टार प्रचारक म्हणून भाजपच्या निवडणूक सभा गाजवायला सुरूवात केली.

सिन्हा यांनी सर्वात प्रथम 1992 मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढविली होती. ही निवडणूक अनेकार्थाने ऐतिहासिक आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. कारण भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवानी यांनी काँग्रेस उमेदवार व सुपरस्टार राजेश खन्ना यांना याच ठिकाणी पराभूत केले होत. मात्र गांधीनगर मतदारसंघातूनही विजयी झाल्यामुळे अडवानी यांनी त्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या पोटनिवडणुकीत राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोन अभिनेते समोरासमोर आले. त्यात खन्ना यांनी सिन्हा यांना धोबीपछाड दिली. हा आपल्या जीवनातील अत्यंत निराशाजनक क्षणांपैकी एक असल्याचे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

भाजपने मग त्यांना 1996 आणि 2002 मध्ये राज्यसभेत पाठविले. त्यानंतर 2009 आणि 2014 मधील लोकसभा निवडणूक त्यांनी बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून लढविली.सध्या ते पाटणा साहिब मतदारसंघातील खासदार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सिन्हा हे आरोग्य व जहाजबांधणी मंत्री होते. लालकृष्ण अडवानी यांचे ते विशेष जवळचे मानले जातात. ‘बिहारी बाबू’ म्हणून ओळखले जाणाऱ्या सिन्हा यांच्या मनात बिहारचे मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती. मात्र राज्यात त्यांच्या ऐवजी भाजपने सुशीलकुमार मोदी यांच्या सारख्या नेत्यांना महत्त्व दिले. भाजपने 2015 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांना जराही महत्त्व दिले नाही.

नरेंद्र मोदी सत्तारूढ झाल्यावर आपल्याला परत मंत्रिपद मिळेल, ही त्यांची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. तेव्हापासून त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदींना धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. त्यासाठी ते विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरही गेले. यशवंत सिन्हा आणि अरूण शौरी या दोन माजी केंद्रीय मंत्र्यांसोबत शत्रुघ्न सिन्हा हेही मोदी सरकारच्या प्रमुख विरोधकांपैकी एक ठरले.

मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटांतील आरोपी याकूब मेमन याची फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी जी याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवण्यात आली होती, त्यावर सिन्हा यांचीही स्वाक्षरी होती. भाजपच्या भूमिकेच्या हे पूर्णपणे विरोधात होते. तसेच बालाकोटमधील हवाई कारवाईचे तपशील जाहीर करण्यची मागणीही त्यांनी सरकारकडे केली होती. मोठ्या संख्येने दहशतवादी मारल्या गेल्याचा दावा हास्यास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्यातही त्यांनी भाषण केले होते.

मात्र भाजपने त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. त्यांची हकालपट्टी करून त्यांना ‘‘राजकीय शहीद’’ बनविण्याची भाजपची इच्छा नव्हती. आता लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल किंवा काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असे बोलले जात आहे. मात्र या केवळ चर्चा असून त्या वास्तवात उतरतात की नाही, हे अद्याप ‘सस्पेन्स’च आहे.

Leave a Comment