यांच्या घरांमध्ये सापडल्या बहुमूल्य, दुर्मिळ वस्तू

vioilin
महागड्या पेंटींग्ज पासून ते एके काळी टायटॅनिकचा प्रवास करून आलेल्या आणि सुदैवाने बचाविलेल्या व्हायोलीन पर्यंत अनेक दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय किंमती वस्तू लोकांना त्यांंच्या घरांमध्ये आजवर सापडल्या आहेत. या वस्तू या लोकांच्या घरांमध्ये असल्याचा शोध कधी अचानक लागला, तर कधी वस्तू वर्षानुवर्षे डोळ्यांच्या देखत असूनही त्यांची खरी किंमत घरातील लोकांना कैक वर्षांच्या नंतर समजली. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका सर्वसामान्य परिवाराच्या घरामध्ये सुप्रसिद्ध डच चित्रकार रेम्ब्रांट यांचे पेंटिंग असल्याची कल्पना इतर कोणाला काय, तर खुद्द या घरामध्ये राहणाऱ्या मंडळींना ही नव्हती. हे पेंटिंग कैक वर्षे त्यांच्या डायनिंग रूम मधील दर्शनी भिंतीवर लावलेले होते. अखेरीस आपल्या पालकांच्या मृत्युनंतर जेव्हा घर विकण्याचे नेड, रॉजर आणि स्टीवन लंडाऊ या तिघा भावांनी ठरविले, तेव्हा डायनिंग रूममधील पेंटिंगसाठी किती किंमत मिळते हे पाहण्यासाठी त्यांनी तज्ञांची मदत घेतली. तज्ञांनी हे चित्र केवळ पाहिले मात्र, हे रेम्ब्रांटचे ओरिजिनल पेंटिंग असल्याचे त्यांना त्वरित लक्षात आले. आपल्या घरामध्ये इतकी बहुमूल्य वस्तू कैक वर्षांपासून आहे याची सुतराम कल्पना नसणाऱ्या लंडाऊ बंधूंना अर्थातच तज्ञांचे म्हणणे ऐकून चांगलाच धक्का बसला.
vioilin1
घरातील लोकांना हे पेंटिंग विशेष कधीच आवडले नसल्याने याकडे काहीसे दुर्लक्षच केले गेले होते. मात्र हे पेंटिंग रेम्ब्रांटचे आहे हे समजल्यानंतर या पेंटिंगचा लिलाव करण्यात आला. २०१६ साली हे पेंटिंग न्यूयॉर्कमध्ये राहणऱ्या थॉमस कापलान नामक व्यक्तीने ८७०,००० डॉलर्सला खरेदी केले.
चीनची ‘मिंग पॉटरी’ अतिशय देखणी असून अतिशय प्राचीन असल्याने दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय किंमतीही असते. पण इंग्लंडमधील डोर्सेट मध्ये राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याने त्यांच्या घरामध्ये छत्र्या ठेवण्यासाठी वापरला जाणारा अतिशय जुना, पण भला मोठा रांजण जेव्हा सहजच ड्युक्स ऑक्शन हाऊसमध्ये, त्याला किती किंमत मिळू शकेल हे जाणून घेण्यासाठी नेला, तेव्हा तो रांजण अठराव्या शतकातील ‘मिंग व्हाज’ असून आताच्या काळामध्ये त्याची किंमत तब्बल १.१ मिलियन पाउंड्स असल्याचे त्यांना समजले !अमेरिकेतील एका संगीतकाराच्या घरातील माळ्यावर त्याला एक अतिशय जुने व्हायोलिन सापडले.
vioilin2
हे व्हायोलिन टायटॅनिक बोटीवरील म्युझिक बँँडचे बँँडमास्टर वॉलेस हार्टली यांचे होते, इतकेच नव्हे तर जेव्हा टायटॅनिकला जलसमाधी मिळाली तेव्हा हे व्हायोलिन हार्टली वाजवीत होते. जेव्हा त्यांचे शव सापडले, तेव्हा त्यांच्या खांद्यामध्ये असलेल्या बॅगमध्ये हे व्हायोलिन सापडले होते. हे व्हायोलिन हार्टली यांना त्यांची प्रेयसी मारिया रॉबिन्सन हिने भेट दिले होते. हार्टली यांच्या मृत्यूनंतर हे व्हायोलिन मारियाकडे सुपूर्त करण्यात आले. त्यानंतर मारियाने व्हयोलिन एका स्थानिक क्लबला भेट दिले होते. तेव्हापासून, १९४० साली हे व्हायोलिन एका संगीतकाराच्या घराच्या माळ्यावर नेमके आले कसे याचा खुलासा होऊ शकलेला नाही. सुरुवातीला हे व्हायोलिन खरोखर हार्टलीचे आहे किंवा नाही याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. त्यानंतर तज्ञांच्या करवी या व्हयोलिनवर अनेक चाचण्या करवून घेतल्यानंतर हे व्हायोलिन हार्टली यांचेच असल्याचे निदान करण्यात आले. २०१३ साली या व्हायोलिनचा लिलाव केला गेल्यावर याला १.८ मिलियन डॉलर्स इतकी किंमत मिळाली.