हा आहे स्पेनच्या गावातील रॉबिन हूड !

robin
स्पेनच्या उत्तर भागातील एका गावामध्ये काही दिवसांपासून घडत असलेल्या एका अजब घटनाक्रमाचा नुकताच उलगडा झाला असून, या घटनेमुळे गोर गरीबांचा तारणहार रॉबिन हूड पुनश्च अवतरला असावा अशी काहीशी भावना स्थानिक लोकांमध्ये दिसून येत आहे. या गावामध्ये राहणाऱ्या गरीब गरजूंची मदत करणारा हा इसम आहे तरी कोण याचा उलगडा अद्याप झालेला नाही. स्पेनमधील विलारामियल गावातील ही हकीकत आहे. या गावामध्ये राहणाऱ्या गरीब, गरजूंची मदत करणारा हा दानवीर गरजूंच्या घरांच्या पोस्ट बॉक्सेसमध्ये पैसे ठेऊन गायब होऊन जातो, तर कधी एखाद्या गरजूला त्याच्या घराच्या दाराखालून घरामध्ये एखादा पैशांनी भरलेला लिफाफा सरकविला गेलेला आढळतो. या सर्व प्रकाराबाबत केवळ आठशेच्या आसपास जनसंख्या असलेल्या या लहानशा गावामध्ये कुतुहलाचे वातावरण आहे.

या तथाकथित रॉबिन हूडने आजवर अनेक गरजूंना आर्थिक मदत केली असली, तरी मदत करणारा हा इसम नक्की आहे तरी कोण याचा पत्ता मात्र आजतागायत गावकऱ्यांना लागलेला नाही. या गावाचे नगराध्यक्षही या बाबत फारसा खुलासा करू शकले नसून, विलारामियल गावामधील पंधरा गरजूंना आजवर या दानवीराने आर्थिक साहाय्य केले असल्याचे म्हटले आहे. या पंधरा गरजूंना प्रत्येकी शंभर युरोजची मदत या दानवीराने केली आहे. ही मदत कोण करीत आहे हे सर्व ग्रामस्थांच्या पुढचे कोडे आहेच, पण त्याशिवाय केवळ याच गावातील लोकांना हा दानवीर का मदत करीत आहे, ही देखील न उकललेले कोडेच आहे. स्पेनच्या प्रसारमाध्यमांनी या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले असून, या अज्ञात दानवीराला ‘विलारामियल चा रॉबिन हूड’म्हटले आहे.

ज्या व्यक्तींना हे आर्थिक साहाय्य मिळाले आहे, त्यांच्या पैकी काहींनी या घटनेची सूचना पोलिसांनी दिली आहे, तर काहींनी बँकेमध्ये जाऊन त्यांना मिळालेल्या नोटा खऱ्या आहेत, किंवा खोट्या हे ही तपासून पहिले असल्याचे समजते. पण कोणाला आर्थिक मदत करणे हा गुन्हा नसल्याने पोलिसांच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते.

Leave a Comment