हॉटेलमधून चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळविण्यासाठी लढवली आगळीच शक्कल

hotel
एखाद्या हॉटेलमध्ये वास्तव्यास गेले की तिथून काही महागड्या वस्तूंपासून अगदी टॉवेल, चादरी देखील सोबत उचलून आणणारे अनेक महाभाग असतात. न्यू ऑर्लियन्समधील रूजवेल्ट हॉटेलमध्ये राहण्यास येणाऱ्या ग्राहकांनी देखील गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक वस्तू गायब केल्या आहेत. अगदी बाथ रोब्स, टॉवेल्स इथपासून महागडी पेंटींग्ज, किल्ल्या, काचेच्या फुलदाण्या, क्रिस्टल ग्लासेस इथवर अनेक वस्तू अनेक ग्राहकांनी या हॉटेलमधून लंपास केल्या आहेत. आता या हॉटेलच्या व्यवस्थापनाने आपल्या जुन्या वस्तू परत मिळविण्यासाठी एक आगळीच शक्कल लढविली आहे.

हॉटेलच्या वतीने एक अतिशय रोचक जाहिरात, वर्तमानपत्रे आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली असून, आजवर जे लोक या हॉटेलमध्ये वास्तव्यास आल्यानंतर हॉटेलच्या मालकीची काही ना काही वस्तू घेऊन बाहेर पडले आहेत, त्या वस्तू त्यांनी हॉटेलला परत कराव्यात असे आवाहन करण्यात आले असून, या सर्व वस्तूंच्या पैकी सर्वात अद्भुत, अनोखी वस्तू ज्याच्याकडे असेल, त्याला हॉटेलच्या आलिशान प्रेसिडेन्शियल सुईटमध्ये सात दिवसांकरिता मोफत वास्तव्य करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे जाहिरातीमध्ये म्हटले आहे. या परत आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्याचा हॉटेल व्यवस्थापनाचा मानस असून, वस्तूच्या ‘मालकाने’ परवानगी दिली तर परत आलेली वस्तू प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

ज्या पूर्व-ग्राहकाने परत केलेली वस्तू सर्वात ‘हटके’ ठरेल त्याला हॉटेलमधील आलिशान सुईटमध्ये वास्तव्याची संधी मिळणार आहेच, शिवाय एक खास शेफ या ग्राहकाच्या भोजनव्यवस्थेसाठी तैनात करण्यात येणार असून, ग्राहकाला स्पा सर्व्हिसही मोफत पुरविण्यात येणार असल्याचे हॉटेल व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले आहे. चोरी करून नेलेली वस्तू परत करणाऱ्या ग्राहकाविरुद्ध कोणतीही औपचारिक तक्रार केली जाणार नसल्याचा निर्वाळाही व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे. या हॉटेलने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या उत्तरादाखल या हॉटेलमध्ये ‘चोरी’ झालेल्या वस्तू पाठविण्यास लोकांनी सुरुवात केली असून, आतापर्यंत परत आलेल्या वस्तूंमध्ये हॉटेलची मेन्यू कार्ड्स, प्लेट्स, मद्याचे अनेक ग्लासेस, फुलदाण्या आणि पितळ्याच्या अनेक किल्ल्यांचा समावेश असल्याचे समजते.

Leave a Comment