मेघालयातील शिक्षिकेच्या अनोख्या प्रयोगातून नऊशे शेतकऱ्यांना लाभ

farmer
२००३ सालच्या उन्हाळ्यामध्ये ट्रिनीटी सैऊ या शिक्षिकेने लहान वयातच आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी आपल्या शेतामध्ये हळदीचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. केवळ घरखर्चासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळावे या कल्पनेने सुरु केलेल्या या प्रयोगाच्या माध्यमातून भविष्यात तिच्या बरोबरच मेघालयातील सुमारे नऊशे शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे याची ट्रिनीटीला थोडी देखील कल्पना नव्हती. ट्रिनीटी सध्या व्यवसायाने शिक्षिका असून, वयाच्या सोळाव्या वर्षापासून तिने शेतामध्ये हळदीचे पिक घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मेघालयातील बहुतेक शेतकरी केवळ तीन प्रकारच्या हळदीच्या प्रजाती पिकवित असून, त्यामध्ये प्रामुख्याने ‘लचेईन’ नामक प्रजाती पिकविली जात असल्याचे ट्रिनीटीच्या लक्षात आले.घरामध्ये गेल्या अनेक पिढ्या शेतीवरच उदरनिर्वाह करीत असलेल्या ट्रिनीटीच्या परिवारातील वडीलधाऱ्या, अनुभवी मंडळींशी जेव्हा ट्रिनीटीने या विषयी चर्चा केली, तेव्हा ‘लचेईन’ ही हळदीची प्रजाती पिकविणे फारसे फायद्याचे नसल्याचे तिच्या लक्षात आले. एकतर ही हळद फारशी पिकत नसे, आणि इतर प्रजातींच्या मानाने यामध्ये औषधी गुण कमी असल्याने या हळदीला बाजाराध्ये फारशी मागणी ही नसे. तेव्हा या बाबतीत अधिक अभ्यास केल्यानंतर ‘लाकाडोंग’ नामक हळदीची प्रजाती ही सर्वोत्तम असल्याचे ट्रिनीटीच्या लक्षात आले.
farmer1
लाकाडोंग ही हळदीची प्रजाती प्राचीन काळामध्ये पिकविली जात असली, तरी अलीकडच्या काळामध्ये या हळदीचे उत्पादन खूपच कमी झाल्याचे ट्रिनीटीच्या लक्षात आले. एकतर शेतीच्या कामामध्ये फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे कमी करून कोळश्याच्या खाणींमध्ये कामे करण्यास सुरुवात केली. त्या काळी खाण कामगारांना नियमित पगार मिळत असे, आणि कामाचीही कमतरता नसे. त्यामुळे हळदीचे उत्पादन आपोआपच कमी झाले. पण २०१४ सालानंतर जेव्हा कोळश्याच्या खाणींमधून उत्खनन करण्यावर बंदी आली, तेव्हा शेतकऱ्यांकडे पुन्हा शेतीकडे वळण्यावाचून कुठलाच पर्याय राहिला नाही. त्यानंतर लचेईन हळदीची शेती प्रामुख्याने होऊ लागली.
farmer2
पण लचेईनच्या मानाने लाकाडोंग ही हळद अधिक उत्तम प्रतीची असल्याचे ट्रिनीटीच्या लक्षात आल्यावर तिने हीच हळद पिकाविण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक प्रशिक्षण मेघालयातील अॅग्रीकल्चर अँड हॉर्टीकल्चर (एएचडी) विभागाकडून ट्रिनीटीने घेतले. हळदीवर पडणारी कीड ही आणखी एक समस्या ट्रिनीटीच्या समोर होती, पण त्यासाठी ट्रिनीटीने रसायनांची मदत न घेता गोमुत्र, गाईचे शेण आणि गांडूळखताचा वापर करून पूर्णपणे इको फ्रेंडली कीटकनाशक तयार केले. पाहता पाहता ट्रिनीटीचा प्रयोग यशस्वी झाला आणि इतर शेतकऱ्यांच्या मानाने ट्रिनीटीच्या शेतामधील हळद तिप्पट किंमतीला विकली जाऊ लागली. ट्रिनीटीला हळदीच्या शेतीतून होत असणारे आर्थिक उत्पन्न पाहून इतर शेतकरीही प्रभावित झाले. या शेतकऱ्यांना ट्रिनीटीने लाकाडोंग हळद उत्पादनाचे प्रशिक्षण देत स्पाईसेस बोर्डच्या सहाय्याने हळदीच्या ‘ट्युब्स’वर सबसिडी देखील उपलब्ध करवून दिली.
farmer4
लाकाडोंग हळदीच्या बिया महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांना या बिया खरेदी करणे परवडत नसे. पण ट्रिनीटी च्या अथक प्रयत्नांनंतर एएचडीने या बिया शेतकऱ्यांना कमी किंमतीत पुरविण्याचे मान्य केले. सध्याच्या काळामध्ये हळदीचे उत्पादन आणि वाढत चाललेली आर्थिक क्षमता पाहता २०१८ सालापसून लाकाडोंग हळदीचे बियाणे शेतकऱ्यांना मोफत पुरविण्यात येत असून, ट्रिनीटीच्या या प्रयोगाने सुमारे नऊशे शेतकऱ्यांची आयुष्ये पालटली आहेत.

Leave a Comment