कथा वीर पृथ्वीराज चौहानची

prithviraj-chauhan
मुहम्मद घोरीच्या तुरुंगवासातील अत्याचारांमध्ये दोन्ही डोळे गेल्यानंतरही पृथ्वीराज चौहानाने मुहम्मद घोरीचा वध कसा केला, ही गाथा इतिहासमध्ये अजरामर आहे. पण आपल्या सुलतानाचा वध केल्याच्या सूडभावनेने पेटलेल्या अफगान सैनिकांनी पृथ्वीराजावर आपला सूड फार विचित्र पद्धतीने घेतला, हे तथ्य फारसे सर्वश्रुत नाही. घोरीचा आपल्या बाणाने वध केल्यानंतर शत्रूच्या हाती पडण्याआधीच पृथ्वीराज आणि त्याचे साथीदार चांद बरदाई यांनी एकमेकांना ठार केले. पण त्यांची पार्थिवे अंत्यविधीसाठी परत न पाठविता अफगाण सैनिकांनी घोरीच्या कबरीच्या बाहेर, प्रवेशद्वाराशीच दफन करविली. घोरीच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने पृथ्वीराजाच्या आणि चांद बरदाई यांच्या समाधींवरून चालत जावे ही त्यामागची सूडभावना होती. पृथ्वीराज ‘चाहामन’ (चौहान) वंशाचा राजा असून, उत्तर पश्चिमी भारतावरील मोठ्या प्रांतावर त्याची सत्ता होती. अजमेर पृथ्वीराजाची राजधानी होती.

फुलन देवीच्या हत्येचा प्रमुख आरोपी शेर सिंह राणाने जेव्हा तिहार तुरुंगातून पलायन केले तेव्हा त्याने अफगाणिस्तानमधे जाऊन तेथून पृथ्वीराज चौहान आणि चांद बरदाई यांचे अवशेष भारतामध्ये परत आणले आणि त्यानंतर या अवशेषांचे प्रथेनुसार अंत्यविधी करण्यात आल्याचे म्हटले जाते. या घटनेला त्या काळी अर्थातच प्रसारमाध्यमांमध्ये खूपच प्रसिद्धी मिळाली. पृथ्वीराज चौहान आणि चांद बरदाई यांची शौर्यगाथा अजरामर व्हावी आणि त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण जनतेच्या मनामध्ये सदैव राहावी यासाठी आपण हे अवशेष भारतामध्ये परत आणल्याचे शेरसिंह राणाने म्हटले होते.

मुहम्मद घोरीच्या वधाशी संबंधित एक रोचक हकीकत आहे. मुहम्मद घोरीच्या कैदेमध्ये असताना दोन्ही डोळे गेल्यानंतरही पृथ्वीराजाने हिम्मत सोडली नव्हती. आपल्या मातृभूमीवर ज्याने वारंवार आक्रमणे केली त्याला त्याबद्दल शिक्षा व्हायलाच हवी हा त्याचा ठाम निश्चय होता. त्यामुळे त्याचा सहकारी चांद बरदाईयाच्याबरोबर संगनमत करून पृथ्वीराजाने एक कारस्थान रचले. पृथ्वीराज चौहान धनुर्विद्येमध्ये अतिशय निपुण असून, ‘स्वरभेदी’ म्हणजे डोळ्यांनी न पाहता केवळ आवाज टिपून अचूक नेम साधण्याचे कौशल्य पृथ्वीराजला अवगत असल्याचे चांदने सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काहीच वेळामध्ये मुहम्मद घोरीच्याही कानी जाऊन पोहोचली. पृथ्वीराजाला अवगत असलेले कौशल्य स्वतः पाहण्याची उत्सुकता घोरीलाही लागून राहिली, आणि पृथ्वीराजाने आपले कौशल्य दाखवावे असा हुकुम फर्माविला.

मुहम्मद घोरीचा अंत करण्याचा हा एकाच मोका पृथ्विराजाकडे होता. जेव्हा पृथ्वीराजला घोरीच्या समोर आणले गेले तेव्हा घोरी नेमका कुठे आहे हे त्याला समजण्यासाठी चांदने एक कविता म्हटली. या कवितेचा अर्थ केवळ पृथ्वीराजालाच समजू शकेल अशी ही कविता होती. ‘अष्ट बांस चौसठ गज, अंगुल अष्ट प्रमाण, ता पाछे सुलतान है, मत चुके चौहान’ , म्हणजे ‘चार बांबू एकासमोर एक मांडल्यावर जितके अंतर होईल, त्यावर चौसष्ट हात आणि आठ अन्गुलांच्या उंचीवर सुलतान बसला आहे, आता तुझा नेम चुकू देऊ नको,’असे सांगणारी ही कविता होती. ही कवित ऐकताच पृथ्विराजाने नेक साधला आणि त्याचा बाण अचूक घोरीला लागला. त्यानंतर अफगाण सैनिकांनी त्यांना पकडण्याआधीच चांद आणि पृथ्विराजाने एकमेकांची हत्याही केली. या दोघांची समाधीसस्थळे पेशावर-अफगाण सीमेवर आजही असून, स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये मात्र आजही या दोघांच्या प्रती रोष आहे.

Leave a Comment