हे होते अमेरिकेचे सर्वात लठ्ठ राष्ट्रपती

america
अमेरिकेचे सत्तावीसावे राष्ट्रपती विलियम हावर्ड टाफ्ट यांच्या लठ्ठ शरीरयष्टीबद्दलचे अनेक किस्से प्रसिद्ध असले, तरी यातील एक किस्सा विशेष प्रसिद्ध समजला जातो. विलियम टाफ्ट राष्ट्रपती असताना जेव्हा त्यांचा मुक्काम व्हाईट हाऊसमध्ये होता. तेव्हा एकदा स्नानाला गेलेले असताना त्यांच्या अवाढव्य शरीरयष्टीमुळे टाफ्टना बाथटबमधून बाहेर पडता येईना. अखेरीस सहा कर्मचाऱ्यांनी मिळून कसेबसे टाफ्ट यांना बाथ टबच्या बाहेर ओढून काढल्याचे म्हटले जाते. टाफ्ट हे अमेरिकेच्या आजवरच्या सर्व राष्ट्रपतींपैकी सर्वात लठ्ठ होते हे जरी खरे असले, तरी बाथ टबमध्ये अडकून बसल्याच्या घटनेमध्ये कितपत तथ्य आहे हे मात्र नेमके सांगता येणार नाही.
america1
अतिशय वजनदार असलेले टाफ्ट तरुणपणी उत्तम मुष्टीयोद्धा होतेच, पण त्याशिवाय नृत्यातही कुशल होते. सहा फुटांची उंची लाभलेले धिप्पाड देहाचे टाफ्ट यांचा राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ संपेपर्यंत त्याचे वजन तब्बल ३४० पौंड झाले होते. शरीराने गलेलठ्ठ असलेल्या टाफ्टचा स्वभाव मात्र अतिशय मृदु होता. किंबहुना सर्व राजकीय नेत्यांपैकी सर्वात विनम्र आणि मृदूभाषी असा टाफ्ट यांचा लौकिक होता. त्यांच्या या स्वभावामुळे अनेकदा लोक त्यांना गृहीत धरत असत. ज्याप्रमाणे जॉर्ज वॉशिंग्ट्न सदैव त्यांच्या दातांच्या समस्येमुळे त्रासलेले असत, त्याचप्रमाणे टाफ्ट त्यांच्या सातत्याने वाढत जाणाऱ्या वजनामुळे त्रासलेले असत. त्यामुळे टाफ्ट यांचे नेहमी कुठले ना कुठले डायट, किंवा वजन कमी करण्यासाठी कोणते ना कोणते प्रयोग सतत सुरु असत.
america2
टाफ्ट यांना स्नान करता यावे यासाठी खास मोठा बाथ टब बनवून घेण्यात आला असून, यामध्ये सामान्य शरीरयष्टीची चार माणसे आरामात बसू शकतील इतका मोठा हा बाथ टब असल्याचे समजते. या बाथ टबची अनेक छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली गेली आहेत. जेव्हा पनामा कॅनालचे निर्माणकार्य सुरु होते, तेव्हा त्याची पाहणी करण्यासाठी टाफ्ट गेले असता, हा बाथटब टाफ्ट प्रवास करीत असलेल्या बोटीवर लावला गेला होता. त्यानंतर हा टब बोटीवरून काढून व्हाईट हाऊसमधील त्यांच्या खासगी स्नानगृहामध्ये लावण्यात आल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment