विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याने भुकेल्या प्रवाशांना पायलटच्या वतीने भोजन

pilot
विमानाचा प्रवास आजकाल सर्वसामन्यांच्या खिशांना देखील परवडण्यासारखा झाला आहे. त्याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्याचे हे एक चांगले माध्यम असल्याने अलीकडच्या काळामध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्यांना परवडण्यासारखा हा प्रवास असावा यासाठी जगभरामध्ये अंतर्देशीय प्रवास करणाऱ्या अनेक ‘लो कॉस्ट’ एअरलाईन्स आहेत. या विमानसेवांच्या दरम्यान बहुतेक वेळी यात्रेकरूंना भोजन पुरविण्याची व्यवस्था नसते, किंवा असलीच तरी यासाठी वेगळे पैसे यात्रेकरूंना भरावे लागत असतात. अशा वेळी विमानामध्ये बसल्यानंतर काही कारणाने विमान उड्डाणाला उशीर झाला, तर मात्र यात्रेकरूंना गंतव्य स्थळी पोहोचेपर्यंत पोटपूजा करणे अशक्य होऊन बसते.
pilot1
असाच काहीसा प्रसंग अमेरिकेतील ओक्लाहोमा येथून जाणाऱ्या ‘मेसा एअरलाईन्स’च्या यात्रेकरूंवर ओढविला. हे विमान उड्डाणासाठी तयार असल्याची सूचना मिळाल्याने सुमारे सत्तर यात्रेकरूंनी विमानामध्ये आपल्या जागा घेतल्या. त्यानंतर विमान धावपट्टीवर येऊन उड्डाणासाठी सज्जही झाले, पण काही कारणास्तव विमानाच्या उड्डाणाला तब्बल अडीच तास उशीर झाला. त्या दरम्यान विमान धावपट्टीवर उभे असल्याने विमानामधून खाली उतरणे हे यात्रेकरूंसाठी शक्य नव्हते. मात्र यात्रेकरू भुकेले असतील याची जाणीव ठेऊन विमानाच्या मुख्य वैमानिकाने स्वखर्चाने सर्व यात्रेकरूंसाठी बर्गर्स मागविले आणि यात्रेकरुंच्या भोजनाची व्यवस्था केली.
pilot2
वैमानिकाच्या या कृत्यामुळे समस्त यात्रेकरूंनी त्याचे तोंडभरून कौतुक करून त्याला मनापासून धन्यवाद दिले. अनेक उत्साही मंडळींनी ताबडतोब सोशल मिडीयावर या संबंधी पोस्ट शेअर केली असून, वैमानिकाच्या चांगुलपणाबद्दल त्याचे तोंडभरून कौतुक करीत, ‘चांगले लोक आणि उत्तम सेवा आजच्या काळामध्ये ही अस्तित्वात असल्याचे’ समाधान व्यक्त केले आहे. घडला प्रकार सोशल मिडियाच्या माध्यमातून एअरलाईन्स व्यवस्थापनापर्यंत पोहोचला असून, यात्रेकरूंच्या प्रशस्तीपर पोस्ट्स बद्दल एअरलाईन्सच्या वतीने यात्रेकरूंचे आभार मानण्यात आले असून, वैमानिकाचे देखील विशेष कौतुक करण्यात आले असल्याचे समजते.

Leave a Comment