ओवैसी-आंबेडकर युती आणि हाजी मस्तानचा इतिहास

combo1

महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) नेते असदुद्दीन ओवैसी एकामागोमाग सभा गाजवत आहेत. दलित-मुस्लिम ऐक्याची ताकत दाखविण्याचा निश्चय दोघांनीही बोलून दाखविला आहे. मात्र त्या निमित्ताने अशा प्रकारच्या दलित-मुस्लिम ऐक्याच्या प्रयोगाची आठवण आल्यावाचून राहत नाही. राज्यात 1984 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि दलित नेते जोगेंद्र कवाडे यांनी अशीच हातमिळवणी केली होती. हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर या युतीची वाताहात झाली. आता तीन दशकांनंतर पुन्हा तोच प्रयोग नव्या नावाने सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात तब्बल 35 वर्षांनंतर पुन्हा दलित-मुस्लिम ऐक्याची भाषा ऐकू येत आहे. या प्रकारची पहिली युती हाजी मस्तान आणि दलित नेते जोगेंद्र कवाडे यांनी केली होती. या दोघांनी मिळून दलित-मुस्लिम अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ काढला होता. त्यावेळी भिवंडीत नुकचीच धार्मिक दंगली झाली होती. दुसरीकडे मुंबईतील गुन्हेगारी जगतात पठाणांचे वर्चस्व कमी होऊन मराठी तरुणांचे प्रमाण आणि वर्चस्व वाढले होते. दाऊद इब्राहीम, अरुण गवळी आणि अश्विन नाईक यांच्यासारख्यांचे प्रस्थ वाढले होते. म्हाताऱ्या झालेल्या हाजी मस्तानला गुन्हेगारी जगतातून बाहेर पडून सभ्य जीवन जगण्याची संधी हवी होती. ती त्याने राजकारण प्रवेशाने साधली.

या संबंधात बोलताना पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (कवाडे गट) अध्यक्ष खुद्द कवाडे यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, की देशाच्या राजकारणात हा एक नवा अनुभव होता. “मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनातून माझी ओळख निर्माण झाली होती. माझ्या प्रयत्नांमुळे हाजी मस्तानने तस्करीचा धंदा सोडला आणि हज यात्रेला गेला. मी महासंघाचा सह-संस्थापक झालो.”

काँग्रेसवर नाराज असलेले आणि शिवसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे विचलित झालेसे काही मुसलमान मस्तानकडे एक सुधारलेला डॉन म्हणून पाहत होते. “आमच्यापैकी काही जण मस्तानला ‘मुस्लिम ठाकरे’ म्हणून प्रोजेक्ट करू पाहत होते. ते स्वतःच्या भाषेत शिवसेनेला उत्तर देऊ शकतील असे आम्हाला वाटले. मुस्लिम आणि दलितांना त्यामुळे उत्साह आला आणि काँग्रेसला पर्याय म्हणून त्याकडे पाहिले गेले,” असे मस्तानला महासंघाची स्थापना करण्यासाठी तयार करणाऱ्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ पत्रकार सरफराज आरजू यांचे म्हणणे आहे.

या महासंघाने मुसलमान आणि दलितांच्या व्होट बँकेसाठी मुंबई आणि उपनगरांवर लक्ष केंद्रीत करणे सुरू केले. मात्र हा पक्ष कधीही उभारी घेऊ शकला नाही. मस्तानची संपत्ती कज्जे-खटल्यांमध्ये अडकली. त्यातून सुटण्यासाठी त्याला काँग्रेसच्या नेत्यांची मदत घ्यावी लागत असे आणि म्हणून त्याला राजकारणात काही करता आले नाही. अखेर 1994 मध्ये मस्तानचा मृत्यू झाल्यानंतर हा दलित-मुस्लिम प्रयोग पूर्णपणे फसला. मस्तानला राजकारणी म्हणून कधीही ओळख मिळाले नाही, त्याच्याकडे नेहमी गुन्हेगारी डॉन म्हणूनच पाहिले गेले.

आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ एकत्र आले आहेत. या दोघांनी मिळून वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे आणि काँग्रेसशी कोणताही समझोता करण्यास नकार दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकून आणि अनेक मतदारसंघात मतांची विभागणी करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान करणाऱ्या एमआयएमने या आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. रिपब्लिकन नेतृत्वावर टीका करीत एमआयएमने दलित कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही याची चुणूक दिसली होती. भविष्यात दलित-मुस्लिम राजकीय आघाडीद्वारे काँग्रेसपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे पक्षाने तेव्हाच सांगितले होते. मात्र एमआयएमचा प्रभाव कमी होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. नांदेडच्या महापालिका निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही वर्षांत दलित नेते म्हणून स्वतःला पुढे आणण्यात मोठे यश मिळविले आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतरचा बंद, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधातील आंदोलन, शहरी नक्षलवाद्यांचे अटकसत्र अशा काही मुद्द्यांमुळे आंबेडकर हे दलित राजकारणाच्या केंद्रभागी आले आहेत. त्यामुळे एमआयएमलाच त्यांचा फायदा जास्त होण्याची शक्यता आहे.

दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघाचा प्रयत्न अल्पजीवी ठरला आणि नामशेष झाला. आता नवा प्रयोग सुरू असताना हा इतिहास विसरू नये म्हणजे झाले. या प्रयोगाचे काय होते, हे पाहण्याची संधी लोकसभा निवडणुकीमुळे लाभली आहे.

Leave a Comment