वाढत्या प्रदूषणामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू – संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल.

pollution
नैरोबी येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण सुरक्षिततेविषयीच्या परीसंवादामध्ये सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार दर वर्षी पर्यावरणाच्या प्रदूषणाला जगभरातील हजारो लोक बळी पडत असल्याचे म्हटले आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे कारखान्यांमधून बाहेर हवेमध्ये टाकले जाणारे अनेक घातक वायू, अनेक रसायनांच्या मुळे व मानवनिर्मित कचऱ्यामुळे प्रदूषित होत असलेले पेयजल, यांच्यामुळे जगभरातील हजारो लोकांना निरनिराळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत असून, अनेकांना अकाली प्राणही गमवावे लागत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी झाल्याने याची झळ जगभरातील अर्थव्यवस्थांनाही पोहोचत असल्याचे ही अहवालामध्ये म्हटले आहे.
pollution1
अशा प्रकारचा अहवाल दर सहा वर्षांनी तयार करण्यात येत असून हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिसंवादामध्ये सादर करण्यात येत असतो. हा अहवाल तयार करण्यासाठी सत्तर देशांतील सुमारे अडीचशे वैज्ञानिकांची सहायता घेतली गेली असल्याचे समजते. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी कायम स्वरूपी दुष्काळ परिस्थिती उद्भविली आहे, तर अनेक ठिकाणी सातत्याने चक्रीवादळे, पूर यांचा धोका वाढल्याचे परिणामही दिसू लागले असल्याचे हा अहवाल म्हणतो.
pollution2
पिण्यायोग्य स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने त्यामुळे उद्भविणाऱ्या आजारांपायी जगभरातील सुमारे चौदा लाख लोक प्रभावित होत असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर औद्योगिकरण आणि वाढत्या जनसंख्येला राहता येण्यासाठी जमिनी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वनराई नष्ट करण्यात आल्यामुळे होणाऱ्या भूमी क्षरणामुळेही जगभरातील जनसंख्या मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले गेले आहे.

Leave a Comment