मसूद अझहरचा खात्मा – चीनचे सोडा, अमेरिकेचे ऐका

masood
कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात हा ठराव आला असताना चीनने केलेली दगाबाजी सर्वांसमोर आली. चीन पाकिस्तानला पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे भारतात साहजिकच रोष निर्माण झाला आहे.

मसूदला जागतिक दहशतवादी जाहीर करावे आणि त्याच्यावर राष्ट्रसंघाने निर्बंध घालावेत, असा प्रयत्न भारत दीर्घकाळापासून करत आहे. परंतु दर वेळेस चीन त्यात खोडा घालतो. राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सदस्य आहेत. राष्ट्रसंघाच्या नियमाप्रमाणे बहुसंख्य सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर तो ठराव मंजूर होतो. मात्र सुरक्षा परिषदेच्या 5 कायम सदस्यांपैकी कोणी नकाराधिकार वापरला तर तो ठराव नामंजूर होतो. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या पाच सदस्यांकडे नकाराधिकार आहे. सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांपैकी 10 आणि नकाराधिकार असलेले 4 असे 14 सदस्य आपल्या बाजूने आहेत. मात्र दरवेळी एकटा चीन त्यात अडथळा बनून उभा राहतो.

गेल्या चार वेळेस मसूरच्या विरोधातील ठराव आपण मांडला होता आणि चीनने त्यात खोडा घातला होता. पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी एकत्रितरीत्या राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत आणलेला ठराव म्हणूनच आपल्याला सुखावणारा होता. गेली अनेक वर्षे बारगळणारा हा ठराव यंदा नक्कीच मंजूर होईल, अशी आपल्याला अशा होती. मात्र याही वेळेस आपला अपेक्षाभंग झाला आणि सलग चौथ्या वेळेस नकाराधिकार वापरून चीनने मसूदला वाचवले. तीन वर्षांच्या आत चौथ्यांदा आपला हा अधिकार वापरून चीनने भारताची गोची केली आहे.

हा संपूर्ण घटनाक्रम भारतासाठी काहीसा खट्टू करणारा असला तरी अनपेक्षित अजिबात नाही. कारण चीन नेहमी भारतविरोधी भूमिका घेत आलेला आहे. चीनचे हृदय परिवर्तन होईल या आशेवर असलेली मंडळी फारच भोळसट होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मात्र त्यातूनच दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे दहशत किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर चीन आपल्या बाजूने उभा राहील याची अजिबात शक्यता नाही. भारताशी चांगले संबंध असल्याचे चीन दाखवत असला तरीही एकंदरीत भारताचे नुकसान कसे होईल हे बघण्यातच त्याला रस आहे. त्यामुळे याबाबत आजच नाही तर भविष्यातही चीनकडून कुठलीही अपेक्षा ठेवणे चूक ठरेल. दुसरी गोष्ट ही, की दहशतवादाबाबत पाकिस्तान भले कितीही गोष्टी करत असला तरी हे त्याचे शुद्ध ढोंग आहे. मसूदसारख्या दहशतवाद्यांना वाचवणे हेच पाकिस्तानचे लक्ष्य आहे.

झाले ते झाले. आता हे सर्व चर्वितचर्वण बाजूला ठेवून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे भारताने राष्ट्रसंघाच्या भरवशावर न राहता स्वतःच्या हिमतीवर यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. सुदैवाने आंतरराष्ट्रीय समुदाय याबाबत आपल्या बाजूने आहे. उलट राष्ट्रसंघाच्या आशेवर न राहता मसूदच्या विरोधात भारताने स्वतःच कारवाई करावी हा मार्ग अमेरिकेने दोन-अडीच वर्षांपूर्वीच भारताला सुचविला होता. भारतातील अशी एखादी कारवाई केली तर काही चूक ठरणार नाही, असे अमेरिकेने मोघमपणे सांगितले होते. एकदा नव्हे तर दोनदा.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भारतीय मूळ असलेल्या निकी हेली यांना राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या दूत म्हणून नियुक्त केले होते. चीनने पाताळयंत्रीपणा करून दुसऱ्यांदा मसूदला वाचविले त्यावेळी याच निकी हेली यांनी तडाखेबंद भाषण केले होते. एखादा देश राष्ट्रसंत नकाराधिकार वापरून दहशतवाद्यांना वाचवत असेल किंवा त्यांची दलाली करत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही. या नकाराधिकारामुळे आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करणार नाही या भ्रमात कोणी राहू नये, असे त्यांनी तेव्हा सुनावले होते,

निकी हेली यांनी त्या भाषणात अमेरिका राष्ट्रसंघावर अवलंबून नाही हे तर स्पष्ट तर केले होतेच. शिवाय भारताची दुर्बळताही जगासमोर मांडली होती. भारताने मसूदसहित अन्य दहशतवाद्यांच्या बाबतीत कोणता मार्ग स्वीकारावा, याचा तो संकेत होता. मसूद अझहर किंवा हफीझ सईद यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानात जाऊन काटा काढावा, असे अमेरिकेने आडवळणाने सुचविले होते. मात्र आपण ती हिंमत दाखवली नाही. हेली यांच्या त्या वक्तव्यातून भारताने प्रेरणा घ्यायला हवी होती. पण भारताने ते धार्ष्ट्य दाखवले नाही. ते धार्ष्ट्य दाखविण्याची वेळ आता आली आहे. मसूद अझहर किंवा अन्य दहशतवाद्यांना राष्ट्र संघ जेरबंद करेल, अशी वेडी आशा बाळगणे आता बंद केले पाहिजे. आपण स्वतः याबाबत पावले उचलण्याची वेळ आहे आहे.

‘जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ असे समर्थ रामदास यांनी म्हटले आहेच. त्याचे पालन करण्याची वेळ आता आली आहे.

Leave a Comment