सवयीचे बळी मुंबईकर

bridge
मुंबईकरांना आता याची सवय झाली आहे. दर वेळेस महिन्यांनी या शहरात दुर्घटना घडते. त्यात काही लोकांचे प्राण हकनाक जातात, सत्ताधारी मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहतात आणि विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. त्यानंतर मुंबईकरांचे प्रसिद्ध ‘मुंबई स्पिरीट’ कार्यरत होते आणि येथील सर्वसामान्य लोक आपल्या दैनंदिन रहाटगाडग्याला जुंपले जातात. त्यानंतर पुन्हा काही महिने सुरळीत पार करतात आणि परत एखादी दुर्घटना समोर येते. तोच खेळ पुन्हा पुन्हा चालू राहतो.

गुरुवारी घडलेली घटना याला अपवाद नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाबाहेरील फलाट क्र. एकला जोडणारा पादचारी पुलाचा मधला भाग संध्याकाळी 7.30च्या सुमारास कोसळला. या घटनेत दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला तर 30अधिक हून व्यक्ती जखमी झाल्या. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील कामा रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा हा पादचारी पूल कसाब पूल या नावाने ओळखण्यात येतो. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाब याचे छायाचित्र येथेच घेण्यात आले होते. म्हणून त्याला कसाबच्या नावाने ओळखले जाते. जे दहशतवाद्याला साधले नाही ते पुलाने साधले!.

नेहमीप्रमाणे या दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाला उत्तम स्थिती असल्याचे प्रशस्तिपत्र देण्यात आले होते. आता तोच पूल कोसळणे हे आक्रीतच म्हणायला हवे. मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची आज सकाळी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसदेखील केली.

मुंबईत पादचारी पूल कोसळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. अगदी अलीकडे 2017 आणि 2018 अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याचाच अर्थ दरवर्षी एक या या प्रमाणात मुंबईतील पूल कोसळत आहेत.

खरी गोष्ट अशी आहे, की महानगरांमध्ये अशा दुर्घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात बांधकाम चालू असलेला एक उड्डाणपूल कोसळला. त्यात 15 जणांचा जीव गेला होता. मुंबईत 3 जुलै 2018 रोजी अंधेरी येथे रेल्वे पादचारी पुलाचा मोठा भाग कोसळून 5 जण जखमी झाले होते. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यापूर्वी सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी होऊन 22 जणांचा जीव गेला होता तर 35 पेक्षा अधिक ग्रुप जखमी झाले होते. ऑक्टोबर 2017 मध्ये केरळमधील कोळ्ळम येथे पूल कोसळून 3 जण मरण पावले होते तर सुमारे पन्नास जण जखमी झाले होते. ऑक्टोबर 2017 मध्येच पंजाबमधील पठाणकोट आणि हिमाचल प्रदेशातील चंबा या गावांना जोडणारा एक पूल कोसळला होता. त्यावेळी फुलावर फारशी गर्दी नसल्यामुळे प्राणहानी झाली नाही, मात्र 6 जण जखमी झाले होते. त्याच्या आदल्या वर्षी मार्च 2016 मध्ये कोलकाता येथे बांधकाम सुरू असलेला विवेकानंद पूल कोसळून 25 पेक्षा अधिक जणांचा जीव गेला होता तर 80 जण जखमी झाले होते.

धक्कादायक हा शब्द वापरून गुळगुळीत व्हावा एवढ्या सातत्याने अशा घटना घडत आहे. मुंबईतच नाही तर देशाच्या अन्य महानगरांमध्ये सुद्धा लोकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. देशातील नागरिकांचा जीव एवढा स्वस्त आहे का, हा प्रश्नही आता जुना झाला.

आज तर परिस्थिती अशी आहे की, प्रत्येकाला जगण्यासाठी शहरात यायचे आहे आणि वाट्टेल ते करून आपली उपजीविका चालवायचे आहे. मग एखादा पूल मोडकळीस आलेला आहे, एखादी इमारत अधिकृत आहे की अनधिकृत, बांधकाम उत्तम आहे का जर्जर अशा प्रश्नांचा विचार करण्याचाही कोणाकडे वेळ नाही. एरवी घाटकोपर किंवा एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटना घडल्यावर धोकादायक पूल काय माध्यमांनी कमी दाखवले होते? लोकांनी धोक्याचा इशारा दिला नव्हता? मात्र त्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. अधिकारी, नेते आणि गुन्हेगार यांचे साटेलोटे एवढे भक्कम असते की त्यांच्याशी दोन हात करण्याएवढी ऊर्जाही लोकांकडे नसते. मग त्यांना शरण जाणे एवढाच पर्याय त्यांच्यासमोर असतो आणि अखेर त्यांना अशा अपघातांना वरचेवर सामोरे जावे लागते.

या अशा हतबलपणातूनच पूल कोसळण्यासारख्या घटना घडतात. त्यावर आठ-दहा दिवस चर्चा होते, निषेधाचे सूर निघतात, सत्ताधारी मंडळी नुकसानभरपाई आणि चौकशा जाहीर करतात, विरोधक त्यांना धारेवर धरतात आणि मग काही दिवसांनी सर्व काही सुरळीत होते. पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. मुंबईकरांना आता याची सवय झाली आहे. त्या सवयीचेच ते बळी ठरत आहेत.

Leave a Comment