शिरुरमधून अमोल कोल्हे तर मावळमधून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात

duo
मुंबई – शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना अखेर दुसऱ्या यादीत मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवार यांचे काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी माढामधून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

राष्ट्रवादीने पहिल्या यादीत बारा उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादीने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतचे प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Comment