कच्छमध्ये सापडले हडप्पा संस्कृतीची साक्ष देणारे मानवी अवशेष

hadappa
केरळ आणि कच्छ विद्यापीठांतील विद्यार्थी आणि संशोधक मिळून एकूण सत्तेचाळीस लोकांची एक टीम कच्छ मधील खटीया गावामध्ये गेले दोन महिने मुक्काम करून आहे. येथे सापडलेल्या एका प्राचीन दफनभूमीतून मानवी अवशेषांचे उत्खनन करून या अवशेषांचा अभ्यास हे विद्यार्थी आणि संशोधक करीत आहेत. या प्राचीन दफनभूमीमध्ये एकूण तीनशे समाधी मिळाल्या असून, यांपैकी २६ समाधीस्थळांचे उत्खनन करण्याचे काम सुरु आहे. ही प्राचीन दफनभूमी हडप्पा संस्कृतीकालीन असण्याचा संशोधकांचा कयास असल्याने या मध्ये मिळालेल्या मानवी अवशेषांवरून हडप्पा संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याचा या टीमचा मानस आहे. हडप्पा संस्कृतीचे अस्तित्व ख्रिस्तपूर्व २६००-१९०० सालच्या दरम्यान अफगाणिस्तान, सिंद, बलोचीस्तान, जम्मू, पंजाब, उत्तरी राजस्थान, काठीयावाड, आणि गुजरात या प्रांतांमध्ये विस्तारलेले होते.
hadappa1
या दफनभूमीमध्ये एका कबरीमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांवरून हे अवशेष एका सहा फुट इंच मनुष्याचे असून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर हे अवशेष दफन असलेल्या कबरीही विशिष्ट प्रकारे बनविल्या गेल्या असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून हडप्पा संस्कृतीकालीन काही विशिष्ट परंपरांचे ज्ञान होत असल्याचे संशोधक म्हणतात. या कबरी आयताकृती असून, दगड रचून यांचे निर्माण केले गेले आहे. या कबरींमध्ये दफन केल्या गेलेल्या शवाचे डोके पूर्वेला असून, पाय पश्चिमेकेडे आहेत. दफन केल्या जाणाऱ्या शवाच्या पायाशी मातीचे घडे आणि काही इतर भांड्यांचे अवशेषही संशोधकांना सापडले आहेत.
hadappa2
या दफनभूमीमध्ये सापडलेली सर्वात मोठी कबर ६.९ फुटांचीची असून, सर्वात लहान कबर १.२ फुटांची आहे. या मानवी अवशेषांच्या व्यतिरिक्त काही बांगड्या, धारदार पाती असलेली, पाषाणाने बनविलेली अस्त्रे, इत्यादी वस्तूही या ठिकाणी सापडल्या असल्याचे समजते. यावरून शव दफन करताना मानवाला मृत्यू नंतरही जीवन असून, त्यासाठी त्याला आवश्यक सर्व वस्तू शवाच्या सोबत दफन करण्याची परंपरा असण्याची शक्यता असल्याचे संशोधक म्हणतात. या दफनभूमीच्या व्यतरिक्त इतरत्र केल्या गेलेल्या उत्खननांमधून सापडलेल्या अवशेषांवरून तत्कलीन जीवनशैली, वास्तुशैली कशी असावी याचीही कल्पना करता येत असल्याचे संशोधक म्हणतात. या प्राचीन दफनभूमीतील अनेक कबरींचे उत्खननाचे काम अद्याप व्हायचे असून,या उत्खननामध्ये सापडणाऱ्या अवशेषांच्या मदतीने हडप्पा संस्कृतीच्या बद्दल अधिक जाणून घेता येईल अशी आशा संशोधकांना आहे.

Leave a Comment