विनोद खन्नाच्या गुरुदासपूर मधून लढणार अक्षय खन्ना?

vinod
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवार निवडीत गुंतले आहेत. भाजपने पंजाब मधील गुरुदासपूर मतदारसंघात दिवंगत खासदार, अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना याच्या नावाला पसंती दिली असल्याचे समजते. विनोद खन्ना या मतदारसंघातून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. कॉंग्रसचा गढ मानली जाणारी ही जागा विनोद खन्ना यांनी १९९८ साली कॉंग्रेस कडून खेचून घेतली होती.

कॉंग्रेस पुन्हा ही जागा त्याच्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि येथून कॉंग्रेसचे पंजाब प्रमुख सुनील जाखड यांना तिकीट दिले जाईल असा तर्क आहे. विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता याही या जागेसाठी उत्सुक आहेत मात्र भाजपची पहिली पसंती अक्षय याच्या नावाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या द अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर या चित्रपटात अक्षयने मनमोहनसिंग यांचे सल्लागार संजय बारू यांची भूमिका केली होती. अक्षय नवा चेहरा असल्याने भाजप मध्ये मतभेद होण्याची शक्यता कमी आहे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment