मग यंदा दिवाळी फटाक्यांसह होणार?

diwali
गेली पाच एक वर्षे झाली दर वेळेस दिवाळी आली, की एक नवीनच वाद उद्भवतो. फटाक्यांमुळे प्रदूषण होते म्हणून फटाके उडवू नका, असा आग्रह स्वतःला पुरोगामी म्हणविणारी मंडळी धरतात. तर फटाके हा दिवाळीचा अविभाज्य भाग असून हिंदूंच्या सणांना अडथळा आणण्यासाठी अशा प्रकारचा प्रचार करण्यात येतो, असा आक्षेप हिंदुत्ववादी मंडळी घेतात. त्यात भर पडते ती न्यायालयातील खटल्यांची. ऐन दिवाळीच्या आगेमागे सार्वजनिक हिताची याचिका (पीआयएल) न्यायालयासमोर सुनावणीसाठी येते. त्यावर न्यायालय सुद्धा कडक निर्णय घेते आणि आनंदाचा व जल्लोषाचा असलेला दिवाळीचा सण वादाचा सण बनून राहतो.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केलेल्या एका टिप्पणीमुळे यंदा ही वादाची मालिका उद्भवणार नाही, अशी अंधुक आशा निर्माण झाली आहे. कारण हवेच्या प्रदूषणासाठी फटाक्यांपेक्षा वाहने हा मोठा स्त्रोत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. फटाके आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत एखादे तुलनात्मक संशोधन झाले आहे का, असा प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.

बाळगोपाळांनी उडविलेले फटाके प्रदूषणाला कारणीभूत ठरतात, असा प्रचार गेली अनेक वर्षे सुरू आहे. याच्या परिणामी फटाके पुरविण्याची पद्धत हळूहळू लोप पावत असून फटाक्यांच्या निर्मितीत गुंतलेले लोक नोकरी गमावत आहेत. त्यामुळे आम्हाला नवीन बेरोजगार तयार करण्याची इच्छा नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

“तुम्ही फटाक्यांच्या मागे लागला आहात, असे दिसते परंतु कदाचित प्रदूषणासाठी जास्त कारणीभूत वाहने आहेत,” असे न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि एस. ए. नाझीर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए. एन. एस. नाडकर्णी यांना सुनावले. संपूर्ण भारतात फटाक्यांचा वापर करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

फटाक्यांमुळे वायु प्रदूषण होते का नाही हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. विशेषतः दिल्लीसारख्या राज्यात जिथे वायु प्रदूषण असह्य पातळीवर पोहोचले आहे, अशा ठिकाणी तर या विषयावर कडाडून भांडणारे दोन गट नेहमीच तयार असतात. फटाक्यांच्या निमित्ताने हिंदू सणांवर घाला घालण्याचा प्रयत्न होतो, असे प्रामाणिकपणे मानणारा एक गट आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे या गटाला आनंद होणे स्वाभाविक आहे. मात्र दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी आणि हवा प्रदूषण तर होतेच. शिवाय फटाक्यांमुळे कचराही होतो, असे मानणारा दुसरा गट आहे. वस्तुस्थिती काय आहे?

दिल्लीतील वायू प्रदूषणासाठी मुख्य कारण हे शेजारच्या राज्यांमध्ये जाळण्यात येणारी चिपाडे व पालापाचोळा हे आहेत, असे संशोधनातून दिसून आले आहे. नेचर सस्टेनेबिलिटी या नियतकालिकात या महिन्याच्या सुरवातीला प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार दक्षिण आशियातील नवी दिल्लीसारख्या महानगरांमधील वायु प्रदूषणासाठी जीवाश्म इंधनाचे दहनच जबाबदार असते असे नाही. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे वाहनांमधून होणारे उत्सर्जन शहरांमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असेलच असे नाही. स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठातील ऑगस्ट अॅन्डर्सन यांनी हे संशोधन केले आहे.

संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, नवी दिल्लीत उन्हाळ्यात होणाऱ्या वायू प्रदूषणात वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा 80 टक्के वाटा असतो. मात्र हिवाळ्यात शेजारील राज्यामध्ये जाळण्यात येणाऱ्या पालापाचोळ्याच्या धुरामुळे तितकेच प्रदूषण होते.

“ब्लॅक कार्बन एरोसोल मानवी आरोग्यास हानिकारक आहेत आणि इतर महानगरांच्या तुलनेत नवी दिल्लीत त्यांची पातळी अधिक आहे. हिवाळ्यात नवी दिल्लीतील प्रदूषणयुक्त वायु कणांचे प्रमाण विश्व आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दहापट अधिक होते,” असे अॅन्डर्सन यांचे म्हणणे आहे.

वायू प्रदूषण हे वाईटच. ते अनेक रोगांना कारणीभूत ठरते आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, दर वर्षी 24 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतो. जगात वायूप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये भारत आणि चीन यांचा समावेश आहे. मात्र हे वायू प्रदूषण फक्त फटाक्यांमुळेच होते हे सांगणारा मजबूत पुरावा उपलब्ध नाही. म्हणूनच गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याऐवजी कमी उत्सर्जन करणारे ग्रीन फटाके विकण्याची मंजुरी दिली होती. तसेच दिवाळीच्या वेळेस रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके उडविण्याचे बंधन घातले होते. ख्रिसमस आणि नववर्षाच्या वेळेस केवळ रात्री 11. 55 ते 12.00 वाजेपर्यंत फटाके उडविण्याची मुभा न्यायालयाने दिली होती.

काही वर्षांपूर्वी दिल्लीतील वायुप्रदूषणावर उपाय म्हणून तेथील सरकारने सम-विषम क्रमांकाचा पर्याय राबविला होता. महिन्यात सम तारखेस क्रमांकाची वाहने तर विषम तारखेस विषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर आणाव्यात असे तेव्हा सरकारने सांगितले होते. त्यानंतर दिल्लीतील प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचे आढळले होते.

आता न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. आता फटाके आणि वाहनांच्या प्रदूषणाची तुलनात्मक आकडेवारी सरकारने सादर केली आणि त्यात त्यापेक्षा वाहनांमुळे जास्त प्रदूषण होते हे सिद्ध झाले तर फटाक्यांना खुली परवानगी मिळू शकते. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाक्यांसह होण्यास काही हरकत नाही.

Leave a Comment