पाकिस्तान – देश नव्हे, शुद्ध ढोंगबाजी!

imran-khan
काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेली हवाई कारवाई, या दरम्यान एक घटना घडली होती. भारत-पाकिस्तान या दोन देशांतील तणावाच्या त्या काळात एका मंत्र्याने असभ्य शेरेबाजी केली होती. त्यानंतर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. पाकिस्तानमधील उदार वातावरणाचे एक उदाहरण म्हणून अनेकांनी ही घटना मोठ्या अभिनिवेशाने मांडली होती. मात्र तो मंत्री म्हणजे बळीचा बकरा होता आणि मुळात पाकिस्तानची इथून-तिथून सगळी व्यवस्थाच सडलेली, कट्टरवादी आणि ढोंगी असल्याचे वास्तव आता पुढे येत आहे.

पाकिस्तानी पंजाब प्रांताचे माहिती व संस्कृती मंत्री फयाजुल हसन चौहान यांनी हिंदूंबाबत शेरेबाजी केली होती. ‘हिंदू हे गाईचे मूत्र पिणारे लोकं आहेत,’ असे ते म्हणाले होते. चौहान हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इंसाफ या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारला त्यांच्या या मुक्ताफळांची दखल घ्यावी लागली आणि अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. स्वतःला शांतीचा मसिहा म्हणून दाखविणाऱ्या इम्रान यांनी या घटनेचा लाभ घेत आपण खूप उदारवादी असल्याचे भासवले होते. आपल्याकडील अनेकांनीही त्यांचीच री ओढत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू कट्टरवाद्यांवर अशी कारवाई का करत नाहीत, अशी टीका केली होती.

मात्र चौहान यांच्यावरील ती कारवाई म्हणजे शुद्ध ढोंग होते, असे इम्रान खानची माजी पत्नी रेहम खान यांनी स्पष्ट केले आहे. रेहम खानने दोन वर्षांपूर्वी आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले होते आणि त्यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी जीवनाबद्दल खळबळजनक दावे करण्यात आले होते.
इम्रान खान हा शरीरसंबंधांच्या बदल्यात महिलांना त्याच्या पक्षात पदे देत असल्याचा आरोपही तिने केला होता. तसेच “इम्रानच्या तेहरीक ए इन्साफ या पक्षाची माध्यम समन्वयक अनिला ख्वाजा हिचे इम्रानशी अवैश संबंध आहेत. ती इम्रानच्या जनानखान्याची सरदार आहे,” असे अनेक आरोप तिने केले होते. त्यावर रेहम खान हिच्याशी लग्न करणे ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती, असे इम्रान खाननी म्हटले होते.

त्याच रेहम यांनी एक लेख लिहून पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे बिंग फोडले आहे. अत्यंत उदारवादी आणि आधुनिक विचारसरणी असलेली व्यक्ती म्हणून मिरविणारा इम्रान खान हा खासगीत मात्र अत्यंत कट्टर आहे, असे रेहम खान यांनी म्हटले आहे.

चौहान यांनी राजीनामा दिल्याचे वाचले तेव्हा उपहासाने मी केवळ हसले, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच चौहान यांची वक्तव्ये ही खान यांनी खासगीत आपल्याशी बोलताना केलेल्या वक्तव्यांसारखीच आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिस्ती आणि हिंदूंबद्दल ते अपमानास्पद शेरेबाजी करायचे, वंशवादी विनोद आणि टिंगल करायचे. इतकेच नव्हे तर घरंदाज महिलांसाठी अभिनय हा अत्यंत घाणेरडा व्यवसाय आहे, असा उपदेश आपल्या सावत्र मुलीला करायचा असेही रेहम यांनी उघड केले आहे.

“जेव्हा मी त्यांच्या मंत्र्यांना नियमितपणे हिंदू किंवा चित्रपट तारे-तारकांबद्दल अपशब्द वापरताना ऐकते तेव्हा मला अजिबत आश्चर्य वाटत नाही. हे लोक केवळ आपल्या नेत्याचेच अनुकरणच करत असतात,” असे त्यांनी म्हटले आहे.

मुळात पाकिस्तान हा देशच ढोंगावर उभा आहे. भारतातूनच निघाला तरी आपला इतिहास भारताशी नव्हे तर अरब देशांशी निगडीत असल्याचे ढोंग तो करतो. मनातून पुराणमतवादी असला तरी आधुनिक असल्याचे ढोंग करतो. पूर्णपणे सरंजामशाही आणि मध्ययुगीन मानसिकता असली तर लोकशाही जीवनशैलीचे ढोंग करतो.

शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तानला अमेरिकेची मदत मिळायची. ती मदत होती विकासाच्या नावाखाली मात्र तिचा वापर त्याने केला तो भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी. त्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानवर अमेरिकेने कारवाई केली तेव्हा त्यातही आपण सहभागी असल्याचे उत्तम ढोंग पाकिस्तानने वठवले. कारण मुळात तालिबान नावाचा भस्मासूर उभाच केला होता तो पाकिस्तानने.

पाकिस्तानचे हेच ढोंग दहशतवाद्यांवर करावयाच्या कारवाईतही दिसून येते. आंतरराष्ट्रीय निर्बंधांना घाबरून जमात-उद-दावा, फलाह-ए-इंसानियत आणि आता जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांवर कारवाईचेही ढोंगच! आम्हाला पुरावे द्या म्हणजे आम्ही कारवाई करतो, हे म्हणणेही ढोंगच!
कारण आताआतापर्यंत पाकिस्तान हाफिझ सईदसारख्या दहशतवाद्याला समाजसेवक म्हणत होता. त्याच्या विरोधात पाकिस्तानात एकही आरोप नाही, असे सांगत होता. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान जनात एक आणि मनात एक करत असेल, तर रेहम खान म्हणते तसे ते बिलकुल आश्चर्यजनक नाही. पाकिस्तान म्हणजेच एक शुद्ध ढोंगबाजी आहे.

Leave a Comment