ऑनलाईन मागवलेल्या जेवणात मिळाली झुरळे

food
सध्याचे जग हे डिजीटल झाले आहे हे आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाही. पण या डिजीटल युगामुळे फायद्यासोबतच तोटे देखील होत असल्याच्या बातम्या आपल्या वाचनात आल्या असतीलच. पण सध्या सोशल मीडियावर अशीच एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामुळे ऑनलाईन जेवण मागवणे आपल्याला देखील जड जाऊ शकते. चीनमधील एका महिलेने ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या जेवणात तब्बल ४० मेलेली झुरळे सापडली आहेत. सध्या सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यासंर्दभात मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मित्रमैत्रीणींसाठी या महिलेने मांसाहारी जेवण मागवले होते. जेव्हा पार्सल आलेले हे खाण्याचे डब्बे या महिलेच्या पाहुण्यांनी उघडले तेव्हा त्यांना त्यामध्ये मेलेली झुरळे आढळली. या प्रकाराचा या महिलेने लगेच व्हिडीओ शूट करुन फेसबुकवर पोस्ट केला आहे. आता फेसबुकबरोबरच ट्विटर आणि युट्यूबबरोबरच इतर सोशल नेटवर्कींग साइट्सवरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एका स्थानिक न्यूज वेबसाईटला या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल आलेल्या जेवणाचा डबा तिच्या मित्राने उघडल्यानंतर त्याला एक मेलेले झुरळ आढळल्यानंतर तिन पार्सल आलेल्या जेवणाची सर्व पाकिटे उघडली, तेव्हा तिला धक्काच बसला. तिला या पाकिटांमध्ये मेलेली चक्क ४० झुरळे सापडली. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे मित्र आणि ती या खाण्याच्या पदार्थांमधून झुरळे बाहेर काढताना दिसत आहेत.

हॉटेलला तसेच स्थानिक पोलीस खात्याला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या हॉटेलचा परवाना पोलिसांनी १५ दिवसांसाठी रद्द केला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यामातून घरपोच डिलेव्हरी देणाऱ्या हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या दर्जासंदर्भात तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

Leave a Comment