ब्रिटनच्या शाही परिवाराचे असे ही थरारक अनुभव

royal
ब्रिटनच्या शाही परिवारातील सदस्य जगातील अतिशय लोकप्रिय व्यक्तींपैकी आहेत. या मंडळींना खासगी आयुष्य असे नाहीच. या मंडळींच्या दिवसभरातील औपचारिक कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त हे कुठे जातात, कोणाला भेटतात इथपासून काय खातात इथवर प्रत्येक गोष्ट प्रसारमाध्यमे आणि नागरिकांसाठी औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय असतो. या सर्वांचे आयुष्य कोणालाही हेवा वाटेल इतके ग्लॅमरस असले, तरी या मंडळींच्या वाट्याला देखील असे अनेक प्रसंग आले आहेत, ज्यांमध्ये यांच्या प्राणाला मोठा धोका उत्पन्न झाला, पण नशीब बल्ववत्तर असल्याने या व्यक्ती बचावल्या.
royal1
ब्रिटनमध्ये दर वर्षी होत असणाऱ्या ‘ट्रूपिंग द कलर’ च्या परेड समारंभामध्ये १९८१ साली राणी एलिझाबेथ सहभागी झालेली असताना या समारंभाला उपस्थित असलेल्या असंख्य नागरिकांच्या पैकी एकाने राणी एलिझाबेथच्या दिशेने सहा गोळ्या झाडल्या. गोळ्यांच्या आवाजाने राणी आरूढ असलेला घोडा उधळला, पण एलिझाबेथने मोठ्या हिंमतीने घोड्याला आवर घातला आणि पुनश्च परेडमध्ये सहभागी झाली. राणीच्या दिशेने झाडलेल्या गोळ्यांपैकी सुदैवाने तिला कोणतीही इजा झाली नाही. १९८८ साली प्रिन्स चार्ल्स स्कीईंग साठी गेलेले असताना अचानक आलेल्या ‘अॅवलांच’ मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि त्यांचे सहकारी अडकले. प्रिन्स चार्ल्स या आपत्तीतून सुखरूप बचाविले असले, त्यांचे सहकारी मेजर ह्यु लिंडसे यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला.
royal2
१९७४ साली राणी एलिझाबेथची कन्या प्रिन्सेस अॅन एका औपचारिक समारंभाहून परत येत असताना इआन बॉल नामक एका इसमाने अॅनचे अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इआनने त्याच्याजवळच्या बंदुकीने अॅनच्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या. बंदुकीचे आवाज ऐकून जवळ असलेला पोलीस कर्मचारी तिथे आल्यानंतर इआनने त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. इआनने अॅनला त्याच्यासोबत चालण्यास सांगितले, पण अॅनने नीडरपणे गाडीतून उतरण्यास साफ नकार दिला. इतक्यात तिथे आलेल्या आणखी काही सुरक्षा कर्मचाऱ्यांची इआनशी झटापट झाली, आणि त्यांनी इआनला ताब्यात घेतल्याने हे थरारनाट्य अखेर संपले. या घटनेच्या नंतर शाही परिवाराच्या सदस्यांच्या सुरक्षेमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली.
royal3
राणी एलिझाबेथचे पुत्र प्रिन्स अँड्र्यू यांची पत्नी सारा फर्ग्युसन हिचे कार्यालय अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीमध्ये १०१व्या मजल्यावर होते. अकरा सप्टेंबर २००१ साली साराला वाहतुकीची कोंडी झाल्याने ऑफिसमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. सारा ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी रस्त्यात असतानाच आतंकवादी हल्ल्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती नष्ट झाल्याची बातमी सारा पर्यंत येऊन पोहोचली. त्यादिवशी जर साराला ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर झाला नसता, तर ती ही या दुर्घटनेतून बचाविली नसती, पण आपले नशीब चांगले म्हणून आपला जीव वाचल्याने आपण दररोज देवाचे आभार मानत असल्याचे साराने एका मुलाखीतीमध्ये म्हटले होते.

Leave a Comment