प्रियंकांचे राजकारणातील पहिले पाऊल – उत्तम आणि आश्वासक!

priyanka-gandhi
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी आपल्या पहिल्याच राजकीय भाषणात प्रभाव पाडण्यात यशस्वी झाल्या. प्रियंका यांची नुकतीच काँग्रेस सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली असून पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्ते इंदिरा गांधींच्या वारसदार म्हणून पाहतात. त्यांच्यामध्ये इंदिरा गांधीची झाक दिसून येते, हेही खरे आहे. प्रियंका आपल्या पहिल्या भाषणात या प्रतिमेशी पूर्णपणे प्रामाणिक राहिल्या. स्व. इंदिरा गांधी यांच्यासारखीच बोलण्याची शैली आणि राजकीय समज त्यांनी दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातच्या जनतेसमोर त्यांनी थेट आणि संयत भाषण केले. आपण कशासाठी राजकारणात आलो आहोत, हेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रियंका गांधी यांनी राजकारण जवळून पाहिले आहे. राजकीयदृष्टया अत्यंत महत्त्वाच्या अशा कुटुंबातील असल्यामुळे लोकांच्याही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून राजकारणात सक्रिय होणार, अशा अफवा पसरत होत्या.विशेषतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील एखाद्या निवडणुकीत पराभव झाला, की त्यांनी राजकारणात यावे अशी आर्त साद पक्षकार्यकर्ते त्यांना घालत. या सर्वाचे प्रतिबिंब त्यांच्या सार्वजनिक वावरातून आणि भाषणातून पडते.

या भाषणात प्रियंकांनी भारतीय जनता पक्ष किंवा भाजपच्या एकाही नेत्याचा उल्लेख केला नाही. अगदी मोदी यांचाही त्यांनी नामोल्लेख टाळला. गेल्या काही दिवसांपासून (किंबहुना वर्षांपासून) काँग्रेस किंवा भाजपचे नेते जीभ मोकळी सोडून बोलत आहेत. जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी वावदूक बोलण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे दिसते. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊन वास्तविक मुद्द्यांवरून लक्ष भरकटते. त्या पार्श्वभूमीवर प्रियंकांचे हे भाषण कौतुकास्पदच म्हणायला पाहिजे.

बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, महिला सुरक्षा, विकास अशा मुद्द्यांवरच प्रियंकांनी आपला रोख ठेवला हे बरे झाले. नाही म्हणायला देशात वाढणारी असहिष्णुता आणि लोकशाही संस्थांचा ऱ्हास अशा काँग्रेसच्या ठेवणीतल्या मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला. गेली पाच वर्षे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते याच मुद्द्यांवरून सरकारला घेरत असल्यामुळे त्यातील दारुगोळा आता बऱ्यापैकी निकामी झाला आहे.

आपल्या भाषणात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याबद्दल वावगा शब्द निघू नये, याची पूरेपूर काळजी प्रियंकांनी घेतली. देशाची जनता आणि देशाचे हितच सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगून त्यांनी चतुराईने द्यायचा तो संदेश दिला. राफेल सौद्यातील तथाकथित गैरव्यवहार, मॉब लिंचिंग, नोटबंदी अशा विषयांवरही एक शब्दही बोलण्याचे प्रियंकांनी टाळले. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची संधी भाजपला मिळाली नाही. म्हणूनच एरवी राहुल गांधींवर टीका करणारे भाजपचे सर्व प्रवक्ते शांत होते.

यातली खरी गंमत अशी आहे, की प्रियंकांनी किमान भाषणाच्या बाबतीत तरी राहुलवर बाजी मारली. राहुलच्या भाषणाशी तुलना करायची झाली तर प्रियंकांनी एका परिपक्व राजकारण्यासारखे भाषण केले. वर म्हटल्याप्रमाणे इंदिरा गांधींची पूर्ण छाप त्यांच्यात दिसून येत होती. चिखलफेक न करता विरोधकांवर कसा शाब्दिक हल्ला चढवायचा, ही सुद्धा एक कला आहे. त्या कलेची एक झलक त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती.

म्हणूनच काँग्रेसला मतदान करा असे थेट म्हणण्याऐवजी त्यांनी साधकबाधक विचार करून मतदान करण्याचे आवाहन लोकांना केले. जे तुमच्या साठी, तुमच्या देशासाठी चांगले असेल ते करा असे त्या म्हणाल्या. इंदिराजींच्याच मार्गावरून चालायचे त्यांनी ठरविले तर या निवडणुकीत प्रियंका भाजपला
जड जाऊ शकतात आणि येत्या काळात प्रियंका राहुलना ओव्हरटेकही करू शकतात.

आता यापुढच्या काळातही प्रियंका आपली हीच पातळी कायम राखतात का, हा खरा प्रश्न आहे. प्रियंका यांच्या प्रचारामुळे काँग्रेसला कितपत फायदा होईल, हा चर्चेचा विषय आहे. अमेठी आणि रायबरेली अशा मतदारसंघांव्यतिरिक्त त्यांनी आतापर्यंत फारसा प्रचार कधी केलेला नाही. तसेच भारतीय मतदार लोकप्रियता आणि वलय पाहून मतदान करतात असे काही राजकारणी आणि माध्यमांना वाटते. काही विवक्षित प्रमाणात हे खरे असले तरी लोकांना वलयापेक्षा आणि लोकप्रियतेपेक्षा काम करणारा नेताच हवा असतो. या कसोटीवर प्रियंका गांधी कितपत उतरतात हेही पाहायला हवे. मात्र त्यांनी सुरूवात तरी चांगली केली आहे, हे नक्की!

Leave a Comment