बालाकोटमुळे भाव वधारला – सट्टा बाजाराचा कौल भाजपला

bjp
सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांतील पहिले मत पडण्याआधीच सट्टा बाजाराने भारतीय जनता पक्षाच्या वतीने कौल दिला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू झाल्यापासून सट्टा बाजाराचे लक्षही या निवडणुकांकडे वळले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) मोठा विजय होईल आणि केंद्रात रालोआचे पुन्हा सरकार येईल, असे म्हटले जात आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे भाजपचा भाव वधारला आहे, असे सट्टा बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे.

काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान मारले गेले होते. त्याचा बदला घेण्यासाठी हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या सीमेत जाऊन बालाकोटमधील दहशतवादी शिबिराला लक्ष्य केले होते. या कारवाईच्या आधी सट्टेबाजांच्या दृष्टीने भाजपला 230 जागा मिळण्याची अपेक्षा होती आणि एकास एक (1:1) असा भाव त्यावेळी सुरू होता. म्हणजेच एक रुपया लावणाऱ्या व्यक्तीला भाजप जिंकला तर एक रुपया मिळाला असता. मात्र आता येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला 245 ते 251 आणि रालोआला 300 पेक्षा अधिक जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुलवामामधील हल्ल्यापूर्वी काँग्रेसला 200 किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळण्याच्या शक्यतेवर 7:1 असा भाव दिला जात होता. म्हणजेच एक रुपया लावणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसच्या विजयावर सात रुपये मिळाले असते. मात्र आता हा भाव 10:1 असा झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला, तर या स्थितीत थोडी फार सुधारणा होऊ शकते. प्रियंका गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार केले तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते, असे सट्टेबाजांचे म्हणणे आहे.

कमी भाव म्हणजे विजयाची अधिक शक्यता, असे गणित सट्टा बाजारात मांडले जाते. त्यामुळे कोणत्या पक्षाला काय भाव मिळाला यावरून त्या पक्षाची स्थिती कशी आहे, याचे अंदाज बांधले जातात. हवाई दलाच्या कारवाईमुळे खंबीर आणि मजबूत सरकार म्हणून नरेंद्र मोदी सरकारची प्रतिमा दृढ झाली आहे. सरकारबाबत आश्वासक भावना निर्माण झाली आहे. त्याचेच प्रतिबिंब या अंदाजात पडले आहे.

राजस्थानमधील फलोदी हे गाव निवडणुकीच्या सट्ट्यांचे मुख्य केंद्र मानला जाते. मुंबई आणि दिल्लीसारखे प्रमुख बाजारसुद्धा त्याच्या आधारे चालतात. निवडणुकांवर लागणारे सट्टे हे क्रिकेटवर लागणाऱ्या सट्ट्यांप्रमाणेच असतात. खरे तर सट्टा बाजाराची जास्त चर्चा क्रिकेट सामन्यांमुळेच होते. एकदिवसीय किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांवर सट्टा खेळला जातो. मात्र निवडणुकांच्या काळातही मोठ्या प्रमाणावर सट्टा खेळला जातो. निवडणुकांमधील सट्टा क्रिकेटपेक्षा जास्त बेभरवशाचा असतो. जनता मतदानातून कोणाला निवडेल आणि कोणाला दूर सारेल याचा नेम नसतो. त्यामुळे सट्टा बाजारात सावध पाऊले टाकली जातात. जेवढी अनि‌श्चितता अधिक, तेवढी सट्टा बाजारातील हालचाली गतिमान होऊन तेजीची शक्यता बळावते. सट्टा बाजारात निवडणुकांवर भाव लावण्याचे प्रमाण आधी कमी होते. मात्र आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे प्रमाण वाढले आहे. लोकसभेच्या निवडणुका 11 एप्रिल रोजी सुरू होऊन सात टप्प्यांमध्ये 19 मे रोजी संपतील. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी सट्टा बाजारातील सौदे पूर्ण करण्यात येतील.

गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, याचा अंदाज सट्टेबाजांना आधीच लागला होता. त्यामुळे मोदी पंतप्रधान होतील, यावर देशभरात 20,000 कोटींपेक्षा अधिक रकमेचा सट्टा लागला होता. सर्वात मोठा सट्टा दिल्ली आणि जयपूरमध्ये लागला होता. या दोन शहरांतच सुमारे 10,000 कोटी रुपयांचा सट्टा लागला होता. यंदाच्या निवडणुकांच्या सट्ट्याबाबत अद्याप फारशी आकडेवारी आलेली नाही, मात्र वेगवेगळ्या राज्यांवर आणि लोकसभा मतदारसंघांवरही सट्टा लावण्यास सुरूवात झाली आहे, असे सांगितले जाते.

असे म्हणतात, की राजकीय वातावरणाचा सर्वात अचूक अंदाज सट्टेबाजांना लागतो. मतदार ज्या पक्षाच्या बाजुने बोलतात तसे सट्टा लावणारे देखील भाव बदलतात. दीड वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भाजपची सत्ता येईल, हा सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांतही याचा प्रत्यय आला होता. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येईल, हे त्यावेळी सट्टेबाजांनी सांगितले होते. मात्र छत्तीसगडमध्ये भाजप फार कमी अंतराने विजयी होईल, हा सट्टेबाजांचा अंदाज चुकीचा ठरला होता.

तूर्तास तरी सट्टेबाजांचे मत आपल्या बाजूने असल्यामुळे भाजपला खुश व्हायला हरकत नाही!

Leave a Comment