भविष्यात निवडणूक लढवायची की नाही तो निर्णय आदित्य आणि शिवसैनिक घेतील

uddhav-thakre
मुंबई – सध्या सर्वच माध्यमांवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार असे वृत्त झळकत होते. आता त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. याविषयी बोलताना, माझ्या कोणत्याही प्रकारचे बंधन शिवसेनाप्रमुखांनी लादले नव्हते, त्यामुळे मी सुद्धा आदित्यवर कोणत्याही प्रकारचे बंधन लादणार नाही. त्यामुळे सध्यातरी आदित्य निवडणूक लढवणार नाही. पण पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही त्याचा निर्णय तो स्वत: आणि शिवसैनिक घेतील असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर सध्या तरी आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही हे स्पष्ट केले. तुम्ही यासंदर्भात त्याच्याशीच चर्चा करा असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार असून एक ते दोन दिवसात उमेदवार जाहीर करु असे उद्धव म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना-भाजपा युतीमध्ये कोणताही दगाफटका होणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आम्ही आडून कोणताही वार केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या रणनितीचा आराखडा तयार केला असून काही निर्णय घेतले आहेत. आणखी बरेच पत्ते आहेत ते आता उघड करणार नाही. युतीत मिठाचा खडा कोणी टाकू शकत नाही असे उद्धव म्हणाले. शरद पवार हे अष्टपैलू आहेत. नेता म्हणून ते चांगले आहेत पण भविष्य कधीपासून सांगायला लागले. पार्थ पवार यांच्या निवडणुकीसाठी जर पाहिले तर पवार सांगतात त्याच्या विरुद्ध करतात असे दिसते असे उद्धव म्हणाले. मी इतरांच्या मुलाचेही माझ्या मुलाबरोबर लाड करतो. मी इतरांची पोर धुणी भांडी करण्यासाठी वापरणार नसल्याचे सांगत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला.

Leave a Comment